एसटीच्या ताफ्यात येणार आणखी दोनशे बसेस

पुणे – खासगी बसेसच्या स्पर्धेत उतरण्यासाठी एसटी महामंडळाच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दोनशे आसनी आणि स्लिपर अशा दोन्ही पध्दतीच्या बसेस घेण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्याची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून येत्या तीन महिन्यांत या बसेस महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. या बसेस राज्यातील महत्त्वाच्या आणि लांब पल्ल्यांच्या मार्गावर धावणार आहेत. या बसेसना उत्तम प्रतिसाद मिळाल्यास अशा प्रकारच्या आणखी बसेस घेण्याचा संकल्प महामंडळाने सोडला आहे.

एसटी महामंडळाच्या ताफ्यात सध्या साडेअठरा हजार बसेस आहेत. तर येत्या महिनाभरात अजून बाराशे बसेस दाखल होणार आहेत. त्यापैकी शिवशाही, हिरकणी, अश्‍वमेध आणि नव्याने सुरू झालेली “स्लिपर कोच’ या वातानुकूलित आणि आरामदायी बसेसना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे खासगी बसेसकडे वळालेला प्रवासी पुन्हा एकदा एसटीकडे आकर्षित झाला आहे. बसचालकांच्या स्पर्धेत टिकणे महामंडळाला शक्‍य झाले असले तरीही खासगी बसेसचा प्रवासी एसटीकडे पुन्हा वळविणे महामंडळाला अद्याप फारसे शक्‍ल्य झालेले नाही. ही बाब लक्षात घेऊन महामंडळाने त्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत, त्याचाच एक भाग म्हणून महामंडळाने आता आसनी आणि स्लिपर कोच अशा दोन्ही पध्दतीच्या बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या बसेसची बांधणी सध्याच्या शिवशाही आणि अस्वमेध या बसेसच्या धर्तीवर करण्यात येणार आहे, चालकाच्या बाजूच्या सिटांवर पूर्णपणे खाली आणि वरती अशा दोन पध्दतीची स्लिपर कोच आसने टाकण्यात येणार आहेत. खाली प्रत्येकी दोन आणि वरती प्रत्येकी दोन प्रवासी प्रवास करु शकणार आहेत, तर वाहकाच्या बाजूची संपूर्ण आसनांची रचना असणार आहे. आसनी प्रवाशांसाठी वेगळा तर स्लिपर कोच प्रवाशांसाठी वेगळा दर आकारण्यात येणार आहे. या दोन्ही पध्दतीच्या रचनेमुळे प्रवाशांना प्रवास करणे सुलभ होणार असून महसूलातही निश्‍चितपणे वाढ होइल, असा दावा महामंडळाच्या वतीने करण्यात आला आहे.

या दोन्ही पध्दतीच्या रचनेमुळे प्रवाशांना एकाच बसमध्ये दोन पर्याय उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे महामंडळाने हा निर्णय घेतला आहे, या बसेसच्या खरेदीची निविदा प्रक्रिया महामंडळाने सुरु केली आहे. मात्र, बसेसची बांधणी आणि अन्य प्रक्रिया यासाठी काहीसा कालावधी लागणार आहे. तरीही ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी महामंडळाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत.
– रणजितसिंह देओल, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)