दोन दिवसांच्या ग्रंथोत्सवाचा पालकमंत्र्याच्या हस्ते शुभारंभ
कोल्हापूर: समाजात वाचन संस्कृती जोपासावी,वाढावी यासाठी राज्य शासनामार्फत वाचन आणि साहित्य संवर्धनाचे विविध उपक्रम राबविले जात आहेत. साहित्याचे संवर्धन करण्यासाठी ग्रंथोत्सव हाही उपयुक्त उपक्रम असल्याचे मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलतांना व्यक्त केले.
शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय कार्यालय कोल्हापूर यांच्यातर्फे राजर्षि छत्रपती शाहू स्मारक भवन येथे आयोजित केलेल्या ग्रंथोत्सवाचा शुभारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते.
वाचनाची आवड टिकावी,वाढावी यासाठी पुस्तकांचे गाव भिलार तसेच स्वागत सत्कार समारंभात गुच्छ देण्याऐवजी पुस्तके भेट देणे असे नव-नवे उपक्रम शासनामार्फत राबविले जात असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ग्रंथालये नव्यानव्या पुस्तकांनी समृध्द व्हावीत यातून समाजात वाचन संस्कृती वाढावी यादृष्टीनेही शासनाचे उपक्रम सुरू आहेत. समाजातील प्रत्येक घटकाने व्यक्तीगत जीवनातही वाचनाची सवय आणि गोडी लावून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
शाळांपर्यंत आणि शाळातील मुलांपर्यंत पुस्तके पोहचावी यादृष्टीने आपण व्यक्तीगतरित्या कै. भालचंद्र चिकोडे वाचनालयाच्या माध्यमातून उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाव्दारे फिरते ग्रंथालय शाळांच्या प्रवेशव्दारावर तसेच मैदानांच्या प्रवेशव्दारावर लावून त्याव्दारे ग्रंथ आणि पुस्तके मुलांपर्यत पोहचविण्याचा नाविण्यपूर्ण उपक्रम हाती घेतला असल्याचेही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. वाचन संस्कृती वाढविण्यासाठी जिल्ह्यातील ग्रंथालयांनी वाचन चळवळीत अधिक सक्रीय होणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा