मॉंट्रियल डब्लूटीए महिला टेनिस स्पर्धा : सिमोना हालेपची व्हीनसवर मात 

सबालेन्का, सेवास्तोव्हा, स्विटोलिना उपान्त्यपूर्व फेरीत 

मॉंट्रियल:  विश्‍वक्रमवारीत अग्रस्थानावर असलेल्या सिमोना हालेपने सात ग्रॅंड स्लॅम विजेत्या व्हीनस विल्यम्सवर सरळ सेटमध्ये सनसनाटी मात करताना मॉंट्रियल महिला टेनिस स्पर्धेत उपान्त्यपूर्व फेरी गाठली. तसेच सहावी मानांकित कॅरोलिन गार्सिया, आर्यना सबालेन्का, अमेरिकन ओपन विजेती स्लोन स्टीफन्स, एलिना स्विटोलिना, ऍश्‍ले बार्टी आणि ऍनेस्तेशिया सेवास्तोव्हा या खेळाडूंनीही वेगवेगळ्या शैलीत विजयाची नोंद करताना उपान्त्यपूर्व फेरी गाठली. 

-Ads-

पावसाच्या व्यत्ययामुळे व्हीनसला एकाच सत्रात दोन सामने खेळावे लागले. पहिल्या सामन्यात 13व्या मानांकित व्हीनसने रुमानियाच्या सोराना सिर्स्टियाचा 7-6, 6-4 असा पराभव केला. परंतु एकाच सत्रात दुसरा सामना खेळण्याचा ताण तिला झेपला नाही आणि हालेपने त्याचा पुरेपूर फायदा घेत 6-2, 6-2 अशी बाजी मारली. हालेपसमोर आता सहाव्या मानांकित कॅरोलिन गार्सियाचे आव्हान आहे. 

गार्सियाने मारिया शारापोव्हाचे आव्हान संपुष्टात 6-3, 6-2 असे आणताना उपान्त्यपूर्व फेरी गाठली. हालेप व गार्सिया यांच्यातील आकडेवारीत हालेप 4-1 अशी आघाडीवर आहे. गार्सियाने गेल्या ऑक्‍टोबरमध्ये बीजिंग स्पर्धेत हालेपवर मात करताना तिच्याविरुद्ध एकमेव विजयाची नोंद केली आहे. बिगरमानांकित आर्यना सबालेन्काने द्वितीय मानांकित कॅरोलिन वोझ्नियाकीवर 5-7, 6-2, 7-6 असा विजय मिळविताना आपल्या कारकिर्दीतील सर्वाधिक सनसनाटी निकालाची नोंद केली. परंतु तिसऱ्या फेरीत तिला 14व्या मानांकित एलिसे मेर्टेन्सकडून 6-2, 6-7, 0-6 अशा पराभवाला सामोरे जावे लागले. मेर्टेन्सला आता पाचव्या मानांकित एलिना स्विटोलिनाशी झुंज द्यावी लागेल. 

इंग्लंडच्या योहाना कॉन्टाने दुसऱ्या फेरीच्या लढतीत दोन वेळा विम्बल्डन जिंकणाऱ्या व्हिक्‍टोरिया आझारेन्काला 6-3, 6-1 असा बाहेरचा रस्ता दाखविला. परंतु तिसऱ्या फेरीत पाचव्या मानांकित एलिना स्विटोलिनाने कॉन्टाचा 6-3, 6-4 असा धुव्वा उडवून उपान्त्यपूर्व फेरी गाठली. तसेच किकी बर्टन्सने आठव्या मानांकित पेट्रा क्‍विटोव्हावर 6-3, 6-2 असा विजय मिळवून आगेकूच केली. 

अमेरिकन ओपन विजेत्या स्लोन स्टीफन्सने स्पेनच्या कार्ला सुआरेझचा 6-2, 7-5 असा सरळ सेटमध्ये पराभव करताना उपान्त्यपूर्व फेरी गाठली. या लढतीत 34 विनर्सची बरसात करणाऱ्या तृतीय मानांकित स्टीफन्ससमोर आता ऍनेस्तेशिया सेवास्तोव्हाचे आव्हान आहे. सेवास्तोव्हानेही जर्मनीच्या 10व्या मानांकित ज्युलिया जॉर्जेसवर 6-3, 7-6 असा खळबळजनक विजय मिळवीत आगेकूच केली. दुसऱ्या फेरीत विम्बल्डन विजेत्या अँजेलिक कर्बरवर सनसनाटी विजय मिळविणाऱ्या ऍलिझ कॉर्नेटचे आव्हान संपुष्टात आणताना 15व्या मानांकित ऍश्‍ले बार्टीने उपान्त्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. बार्टीने हा सामना 7-6, 6-4 असा जिंकला. 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)