पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मदने यांचा जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना सूचना
कराड – पंचायत समिती सदस्यांच्या गावात पाण्याच्या टाकीचे बांधकाम केले जात असून जागेबाबत सदस्यांनी केलेल्या सूचनांना मान दिला जात नाही. मात्र ग्रामपंचायतीने केलेल्या मागणीनुसार तत्काळ कार्यवाही केली जाते. संबंधित विभागाकडून आमच्या शब्दाला मान दिला जात नसेल तर जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी यापुढे ग्रामपंचायतीसमोरच अहवाल द्यावा. पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीची जागा का बदलली? याचा खुलासा देवूनच टाकीचे काम सुरू करावे, अशा सक्त सूचना पंचायत समिती सदस्य चंद्रकात मदने यांनी शुक्रवारी झालेल्या मासिक सभेत दिल्या.
सभापती फरिदा इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली मासिक सभा पार पडली. यावेळी उपसभापती सुहास बोराटे, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांची उपस्थिती होती. पंचायत समितीच्या सदस्यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात गैरहजर राहणाऱ्या राज्य शासनाच्या विविध विभागाच्या अधिकाऱ्यांकडून लेखी खुलासा घ्यावा, असा महत्त्वपूर्ण ठराव यावेळी करण्यात आला.
जीवन प्राधिकरणाच्या आढावा वेळी जलस्वराज्य प्रकल्पातंर्गत सहा योजना मंजूर झाल्या असल्याची माहिती जीवन प्राधिकरणाचे सहाय्यक कार्यकारी अधिकारी ए. आर. डोंगे यांनी दिली. यावेळी विरवडे गावाचे पंचायत समिती सदस्य यांनी विरवडे येथे पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीचे काम सुरू आहे. त्या टाकीची जागा सुरुवातीला ठरलेल्या जागेच्या ठिकाणी न करता दुसऱ्या ठिकाणी का करण्यात येत आहे? असा प्रश्न उपस्थित केला. यावर जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार जागा बदलल्याचे सांगितले.
यावर मदने यांनी मी सुरुवातीच्या बैठकीत जागा बदलण्याबाबत सूचना केल्या होत्या. त्यावर आपण एकदा सर्व्हे झाल्यानंतर जागा बदलता येत नसल्याचे उत्तर दिले होते. तरीही आपण जागा का बदलली? जागा बदलत असताना त्या गावचा पंचायत समिती सदस्य म्हणून मला विश्वासात का घेतले नाही? पाण्याची टाकी बांधत असताना पुढील 50 वर्षांचा विचार करून टाकीचे बांधकाम केले जात आहे का? अशा अनेक प्रश्नांचा भडिमार सुरू केला. तसेच आपण कार्यालयात अनुपस्थित राहत असल्याचा आरोपही केला.
यावर अधिकाऱ्याने ग्रामपंचायतीच्या सूचनेनुसारच जागा बदलली असल्याचे प्रतित्तर देत तुम्ही कधीही कार्यालयात या असे सांगितले. यावर आम्हाला जर अधिकाऱ्यांकडून किंमत दिली जात नसेल तर त्यांनी यापुढे ग्रामपंचायती समोरच कामाचा अहवाल द्यावा अशा सक्त सूचना मदने यांनी केल्या. यानंतर काही सदस्यांनी राज्य शासनाच्या बांधकाम, भूमी अभिलेख यासारख्या अनेक विभागाचे अधिकारी आजपर्यंतच्या कार्यकालात एकदाही मासिक सभेत उपस्थित राहिले नाहीत. सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न त्यांच्याशी निगडीत असतात. मात्र त्यांना याबाबत विचारले असता कार्यालयात या सगळी माहिती देतो अशी प्रतित्तरे दिली जातात. अधिकाऱ्यांकडून आम्हाला अशी वागणूक मिळत असेल तर त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे असल्याची मागणी केली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून लेखी खुलासा घ्यावा, अशीही मागणी उपसभापती सुहास बोराटेंसह सदस्यांनी केली.
तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात यांनी कृषी विभागाच्या आढाव्यावेळी खरीप हंगामाच्या दृष्टीने तयारी पूर्ण झाल्याची माहिती दिली. तालुक्यात 45 कृषी सहाय्यकांमार्फत शेती कार्यशाळा घेण्यात येत असून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्याचे सांगितले. यावेळी पाणीपुरवठा, शिक्षण, एकात्मिक बालविकास अशा विविध विभागांचा आढावा घेण्यात आला. तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात यांच्या बदलीबाबत त्यांचा सत्कार करण्यात आला.
पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मदने यांनी यापूर्वीच पाण्याच्या टाकीची जागा बदलण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर ग्रामपंचायतीकडूनही लेखी मागणी आल्यानंतर लोकप्रतिनिधींचा मान राखावा, या उद्देशाने आम्ही जागा बदलली आहे. सध्या पाण्याच्या टाकीचे साठ टक्के बांधकाम पूर्ण झाले असून उर्वरित कामही लवकर पूर्ण करण्यात येईल. सदस्य मदने यांनी उपस्थित केलेल्या शंकेचे त्यांना समक्ष भेटून निरसन करू.
ए. आर. डोंगे, सहाय्यक कार्यकारी अधिकारी, जीवन प्राधिकरण