पुणे – नैऋत्य मोसमी (मान्सून) पावसाची राज्यभरात दमदार वाटचाल सुरू झाली आहे. गेल्या 24 तासांत कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून, पालघर येथे सर्वाधिक 380 मिमी पावसाची नोंद झाली.
राज्यात मान्सून चांगलाच सक्रीय झाला असून, कोकण-गोवा आणि विदर्भातील बहुतांश भागात जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातही काही भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. मात्र, मराठवाड्यात अजूनही मान्सून सक्रीय झाला नसून, तेथील शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
पुढील दोन दिवसांत दि. 3 जुलै रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. कोकण-गोव्यात काही ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर, शहरात मंगळवारी (दि. 2) दिवसभर पावसाने उघडीप दिली होती. मात्र, सायंकाळी पुन्हा पावसाची जोरात सर आली. येत्या दोन दिवसांत शहरात हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, अशी शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.