राज्यभरात ठिकठिकाणी पाऊस : पुण्यात ढगाळ वातावरण
पुणे – राज्यातील विविध भागांत बुधवारी सकाळपासून सुरू झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे मान्सूनच्या आगमनाचे वेध लागले आहेत. कोकणासह मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत या पावसाने हजेरी लावली. दरम्यान, मान्सूनची वाटचाल सुरू झाली असून येत्या दोन ते तीन दिवसांत तो कोकणात दाखल होण्याची शक्यता आहे.
“वायू’ वादळ विरल्याने पुन्हा एकदा मान्सूनची वाटचाल सुरू झाली आहे. सध्या मान्सून कर्नाटकाच्या दक्षिण भागापर्यंत पोहचला आहे. मान्सूनच्या वाटचालीसाठी आवश्यक पोषक वातावरण निर्माण झाले असून अशीच प्रगती सुरू राहिली, तर येत्या दोन ते तीन दिवसांत तो कोकणात दाखल होईल.
दरम्यान, बुधवारी सकाळपासून राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पूर्व मोसमी पावसाने हजेरी लावली. कोकणातील अनेक भागात आज दुपारनंतर मुसळधार पाऊस झाला. घाट माथ्यावरही मान्सूनच्या आगमनाची चाहूल देणारे ढग जमा होऊ लागले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात रिमझिम पावसाच्या सरी झाल्या. पुण्यातही बुधवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. सकाळी काही भागात सरी झाल्या. त्यानंतर दिवसभर ढगाळ वातावरण होते.