राष्ट्रवादीच्या समद खानसह २० जणांविरोधात मोक्का

नगर: राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मुकुंदनगर येथील नगरसेवक व सध्या न्यायालयीन कोठडीत असलेला समद खान याच्यासह २० जणांविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये (मोक्का) प्रस्ताव तयार करण्याचे काम भिंगार कॅम्प पोलिसांकडून सुरू आहे. तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यानंतर या प्रस्तावावर आता सहायक पोलीस निरीक्षक शंकरसिंग राजपूत हे काम करत आहेत. सदर प्रस्ताव मंजुरीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांसमोर सादर करण्यात येणार आहे.

खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात तब्बल एक वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर काही महिन्यांपूर्वीच समद खान हा बाहेर आला होता. अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत खान हा पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकिटावर विजय झाला. भाजपसोबत घरोबा केल्याने पक्षातून हकालपट्टी केलेल्या नगरसेवकांमध्ये त्याचाही समावेश आहे. काही दिवसांपूर्वी मुकुंदनगरमध्ये दोन गटात दंगल झाली होती. या दंगलीप्रकरणी खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमान्वये भिंगार कॅंप पोलीस ठाण्यात 48 जणांविरोधात गुन्हे दाखल आहे. एका गटाचा म्होरक्‍या म्हणून नगरसेवक समद खान याचा उल्लेख करण्यात आला आहे. समद खान याला पुण्यातून स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली होती. दंगलीनंतर दुसऱ्या दिवशी तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. तेव्हापासून समद खान हा नाशिक तुरुंगात आहे.

मुकुंदनगर परिसरात वारंवार निर्माण होणाऱ्या कायदा-सुव्यवस्थेत नगरसेवक समद खान हाच जबाबदार असल्याचा ठपका ठेवून पोलिसांनी त्याच्यासह साथीदारांविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये (मोक्का) कारवाईचा प्रस्ताव तयार केला जात आहे. भिंगार कॅम्प पोलीस या प्रस्ताव अंतिम पातळीवर काम करत आहे. त्यानंतर हा प्रस्ताव पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्यासमोर सादर होईल. त्यानंतर तो मंजुरीसाठी नाशिक येथील विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोर्जे यांच्याकडे पाठविला जाणार आहे.

अधीक्षक कार्यालयावरील हल्ल्यात सहभाग

समद खान याच्याविरोधात 21 पेक्षा जास्त गुन्हे आहे. त्यातील बहुतांशी गुन्हे समझोताकरून मिटविण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक कार्यालयावरील हल्ल्यात त्याचाही सहभाग आहे. न्यायालयात या गुन्ह्याचे दोषारोपपत्र दाखल असताना मुकुंदनगर येथील दंगलीत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)