मोहम्मद कैफचा क्रिकेटला अलविदा

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाने 13 जुलै 2002 मध्ये इंग्लंडमध्ये ऐतिहासिक नॅटवेस्ट वन डे मालिका जिंकली होती. त्या सामन्यात युवराज सिंगसह अविस्मरणीय खेळी साकारणाऱ्या मोहम्मद कैफने 16 वर्षांनंतर बरोबर त्याच दिवशी स्पर्धात्मक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. नोव्हेंबर 2006 मध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरचा सामना खेळला होता.

मोहम्मद कैफने भारताकडून 13 कसोटी व 125 एकदिवसीय सामने खेळले आहेत. 2002 साली झालेल्या नॅटवेस्ट सीरिजच्या फायनलमध्ये कैफने लॉर्डसच्या मैदानावर 87 धावांची खेळी करून भारताला विजय मिळवून दिला होता. हा सामना 13 जुलै रोजी खेळला गेला होता तर आज 13 जुलै रोजीच मोहम्मद कैफने निवृत्तीची घोषणा केली हे विशेष.

क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची माहिती कैफने एका ई-मेलवरून दिली. भारतीय संघ सध्या इंग्लंडविरुद्ध नॅटवेस्ट सीरिज खेळण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर आहे. हे निमित्त साधून मोहम्मद कैफने निवृत्ती जाहीर केली. मी आज निवृत्त होत आहे. त्या ऐतिहासिक नेटवेस्ट सीरिजला 16 वर्षे लोटली आहेत. त्यावेळी मी भारतीय संघाचा घटक होतो.

भारतासाठी खेळणे माझ्यासाठी नेहमीच आनंददायक होते, असे मोहम्मद कैफने म्हटले आहे. कैफने 13 कसोटीत 32च्या सरासरीने 2753 धावा केल्या आहेत. कैफने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली असली, तरी त्याने क्रिकेट समालोचक म्हणून करीयरची दुसरी इनिंग सुरू केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)