मोदींची नवी इनिंग आजपासून होणार सुरू

बिग फोर मंत्रालये कुणाकडे जाणार याविषयी उत्सुकता

नवी दिल्ली -घवघवीत यश संपादन करून सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यास सज्ज झालेल्या नरेंद्र मोदी यांची नवी इनिंग उद्यापासून (गुरूवार) सुरू होणार आहे. त्यांच्या समवेत केंद्रीय मंत्रिपदांची शपथ घेण्याचा मान कुणाला मिळणार याविषयीचा सस्पेन्स कायम आहे. त्याशिवाय, गृह, अर्थ, संरक्षण आणि परराष्ट्र ही बिग फोर मंत्रालये कुणाकडे जाणार याबाबतही कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

राष्ट्रपती भवनाच्या आवारात गुरूवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास शपथविधी सोहळा होईल. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. त्या सोहळ्याला सुमारे 8 हजार पाहुणे उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आदी विरोधी पक्षनेत्यांबरोबरच बिमस्टेक देशांचे प्रमुख, उद्योगपती, चित्रपट तारे, विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचाही समावेश असेल. शपथविधी सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यात मॅरेथॉन बैठक झाली. त्या बैठकीत मंत्रिमंडळ रचनेला अंतिम रूप देण्यात आल्याचे समजते.

राजनाथ सिंह, नितीन गडकरी, निर्मला सीतारामन्‌, रविशंकर प्रसाद, पियूष गोयल, स्मृती इराणी, धर्मेंद्र प्रधान, नरेंद्रसिंह तोमर आणि प्रकाश जावडेकर यांना केंद्रीय मंत्री म्हणून सलग दुसरा कार्यकाळ मिळणार असल्याचे निश्‍चित मानले जात आहे. मंत्रिमंडळात बरेच नवे चेहरेही दिसण्याची शक्‍यता आहे. पश्‍चिम बंगाल, ओडिशा, तेलंगण या राज्यांमध्ये भाजपची कामगिरी चांगली झाली. त्याचे प्रतिबिंब मंत्रिमंडळ रचनेत उमटण्याची शक्‍यता आहे. मोदींप्रमाणेच भाजपच्या यशस्वी घोडदौडीत मोलाची कामगिरी बजावणाऱ्या शहांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार का, याविषयीही तर्क-वितर्क सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)