पोलीसप्रशासनाकडूनही नियोजन
नगर: भाजप-शिवसेना युतीचे लोकसभा निवडणुकीतील उमेदवार डॉ. सुजय विखे व खा. सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी नगरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी (दि. 12) सभा होत आहे. या सभेच्या नियोजनासाठी आज विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व पालकमंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीत भाजप-शिवसेना व मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांची नियोजन बैठक घेण्यात आली.
यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी, खा. दिलीप गांधी, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, ज्येष्ठ नेते ऍड. अभय आगरकर यांच्यासह भाजप, शिवसेना, रासप, रिपाइं व मित्रपक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते. शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता सावेडी येथील संत निरंकारी भवनाजवळील मैदानावर ही सभा होणार आहे. पंतप्रधान मोदी हे शिर्डी येथे विमानाने येणार असून, तेथून ते हेलिकॉप्टरने सभास्थळी येणार आहेत.
पोलीस प्रशासनाकडूनही या सभेची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने सभास्थळाकडे जाणारे जाणाऱ्या मार्गावरील रहिवाशांची माहिती पोलिसांकडून घेण्यात येत आहे. तसेच बंदोबस्तासाठी जिल्ह्याबाहेरूनही पोलीस बंदोबस्त मागविण्यात येणार असल्याचे समजते. तसेच सभास्थळाकडे येणारे रस्ते वाहनांसाठी बंद करण्यासाठी बॅरिकेडिंगही करण्यात येणार आहे.