मोदींची मुंबईत तर राहुल गांधींची संगनेरमध्ये आज सभा

शनिवारी प्रचाराच्या तोफा थंडावणार

मुंबई – लोकसभा निवडणूकीच्या महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील मतदानाला अवघे तीन दिवस शिल्लक राहिले असतानाच 17 मतदारसंघातील प्रचार शिगेला पोहोचला आहे. आरोप-प्रत्यारोपांनी प्रचाराचा धुरळा उडाला असतानाच आता शेवटच्या टप्प्यातील महाआघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांसाठी दिग्गज नेत्यांनी प्रचारसभांचा जोर लावला आहे. शनिवारी प्रचाराच्या तोफा थंड होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी व कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची उद्या, शुक्रवारी महाराष्ट्रात जाहिर सभा होणार आहेत.

महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यात 17 मतदारसंघात 323 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्‍चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण, मावळ, शिरूर आणि शिर्डी अशा 17 लोकसभा मतदारसंघांत 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या 48 तास आधी म्हणजेच शनिवारी प्रचाराच्या तोफा थंडवणार आहेत. त्याअगोदर उद्या, 26 एप्रिल रोजी मुंबई, ठाणे, कल्याण व भिंवडीमधील महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहिर सभा होणार आहे. पहिला, दुसरा आणि तिसऱ्या टप्प्यातील महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची महाराष्ट्रात सभा झाल्या आहेत. आता शेवटच्या टप्प्यातील सभा मुंबईत होत आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्‍स परिसरातील मैदानावर सायंकाळी मोदींची सभा होणार आहे. या सभेसाठी भाजपा-शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जय्यत तयारी केली आहे. सभेच्या व्यासपीठावर मोदींबरोबरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच युतीचे उमेदवारही उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधान मोदींची मुंबई सभा सुरु असतानाच त्याचवेळेला दुसरीकडे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची शिर्डी लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेस उमेदवारासाठी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे जाहिर सभा होत आहे. लोकसभा निवडणूकीत दिल्लीतील बड्या नेत्यांनी महाराष्ट्रातील लढतींकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळेच राहुल गांधींनी लोकसभा निवडणूकीदरम्यान नागपूर, वर्धा, चंद्रपूर, नांदेड येथे सभा घेतल्या आहेत. तर पुणे येथे विद्यार्थ्यांशी त्यांनी संवादही साधला होता. शेवटच्या टप्प्यातील या सभेमध्ये राहुल गांधी हे सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या सभेसाठी जास्तीत जास्त कार्यकर्त्यांची गर्दी जमविण्यासाठी कॉंग्रेस नेते कामाला लागले आहेत, अशी माहिती सुत्रांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)