मोदींच्या विजयाचा अन्वयार्थ (भाग २)

मोदींच्या विजयाचा अन्वयार्थ (भाग १)

मोदींना मतदान करणारा गरीब वर्ग आणखी अनेक गोष्टींनी प्रभावित झाला होता. दिसायला किरकोळ विषय वाटावा असा प्रत्येक घरात शौचालय बांधण्याचा विषय नरेंद्र मोदींनी स्वत: हाती घेतला आणि देशभरात काही कोटी शौचालये बांधली गेली. ग्रामीण भागातल्या महिलांची कुचंबणा किती होत होती आणि त्या या सुविधेमुळे किती सुखावल्या याचा अंदाज विरोधकांना आलाच नाही. मोदींना या महिलांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केलं आहे. महिलांसाठी आणलेली उज्ज्वला योजनाही अशीच मोठा परिणाम साधून गेली आहे. महिलांच्या बाबत बोलायचं तर मुस्लीम महिलांचा विचार करायला पाहिजे.

त्रिवार तलाक हा मुस्लीम महिलेच्या डोक्‍यावर टांगती तलवार असलेला विषय. याला हिमतीने कुणी भिडायला तयार नव्हतं. ते काम केलं नरेंद्र मोदींनी आणि या महिलांचा सन्मान वाढवण्याचा बिगूल वाजवून टाकला. स्वच्छता अभियानही असंच सर्वसमावेशक आहे. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीतून सामान्य माणूस सरकारी यंत्रणेशी जोडला गेला, सरकारच्या धोरणाचा प्रत्यक्ष लाभ पाहू लागला, अनुभवू लागला. सामान्य जनतेला नेत्याने आपल्याशी कोणत्या ना कोणत्या प्रकारे जोडून घ्यायला लागतं. ते मोदींना उमगलं, इतरांना नाही.

सैनिकांची ‘एक पद एक निवृत्तिवेतन’ ही किमान वीस वर्षे प्रलंबित असलेली मागणी होती. मोदींनी या प्रश्‍नाचा तातडीने तडा लावला आणि सैनिकांची ही अनेक वर्षांची मागणी सन्मानपूर्वक पूर्ण केली. देशात माजी सैनिकांची लाखो कुटुंबे आहेत आणि काही कोटी मतदार त्यांच्या कुटुंबातील आहेत. याशिवाय नोकरीत असलेले सैनिकही सुखावले असल्याने त्यांच्या कुटुंबीयांकडूनही मोदींना प्रचंड समर्थन मिळालं आहे. हे सगळं मतदान यंत्रातून स्पष्ट झालं आहे.

आयुष्मान योजना, जनधन योजना, थेट अनुदान जमा होण्याची सुविधा असे जनसामान्यांचं जगणं अधिक सुकर करणारे निर्णय सामान्यांना भावले होतेच. अप्रत्यक्ष झालेली मदत फारसा प्रभाव टाकत नाही, जितका प्रत्यक्ष झालेली मदत टाकते. मोदींच्या या सगळ्या छोट्या योजनांनी सामान्यांच्या जगण्याला प्रत्यक्ष स्पर्श केला असल्याने त्यांचा प्रभाव आतपर्यंत पोहोचला होता. मोदींनी जनतेच्या डोक्‍यात असलेली खदखद ओळखली होती. त्यांनी केलेला सर्जिकल स्ट्राईक, बालाकोट या सगळ्यांमुळे जागृत भारतीयाच्या अपेक्षा पूर्ण झाल्या.

हे असंच खंबीर नेतृत्व हवं होतं असं लोकांना वाटतहोतं. देशातली ही परिस्थिती आणि जगभरात मोदींनी उजळलेली देशाची प्रतिमा. हे सगळं सामान्य जन पाहात होते. विरोधकांना जनसामान्यांची नाडी समजलीच नाही. केवळ मोदींच्या नावाने टाहो फोडला की काम भागते म्हणून भाषणबाजी करणारेही नेमले गेले. झालं काय? सगळे भ्रमात राहिले आणि मोदींनी बाजी मारली. जनसामान्यांमधे मोदींबाबत किती आत्मियता असावी यासाठी एक उदाहरण पुरेसं आहे. कॉंग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी वर्षाकाठी तब्बल बहात्तर हजार देण्याचं आश्वासन दिलं तरीही सामान्य जनतेने ते एकाप्रकारे धुडकावलं आहे.

विरोधकांनी मोदींच्या चांगल्या योजनांचं कौतुक केलं असतं, सर्जिकल स्ट्राईक आणि बालाकोटसारख्या घटनांच्या मागे औपचारिकतेपलिकडे जाऊन कौतुक केलं असतं आणि मोदींच्या या योजना आम्ही वेगात पुढे नेऊ अशी सकारात्मक भूमिका घेतली असती तरीही आताइतकी वाताहात झाली नसती. मोदींच्या यशाचा अन्वयार्थ लावायचा तर हे सगळे मुद्दे त्रयस्थपणे विचारात घ्यायला लागतील. असा विचार न करताच काही विश्‍लेषण करायचं ठरवलं तर ते नकीच एकांगी होईल आणि विश्‍लेषकाने स्वत:चीच केलेली फसवणूक होईल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)