मोदींच्या विजयाचा अन्वयार्थ (भाग १)

भाष्य : आनंद गांधी  :  


 सुस्त, मरगळ आलेल्या यंत्रणेला नरेंद्र मोदी यांनी जागे केले, हलवले, कामाला लावले. धोरण पंगुत्वाची जी ओरड गेल्या दशकभरात सुरू होती, ती बंद झाली. कार्यक्षम, कणखर आणि तेवढाच धडाडीने निर्णय घेणारा नेता मोदींमध्ये दिसला. या नेत्याला त्यांनी पुन्हा एकदा कमान सोपवली.

लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि तज्ज्ञ समजणाऱ्या बहुतेकांचे अंदाज पूर्ण चुकले. वरकरणी कोणतीच लाट दिसत नव्हती, अनेक विरोधी पक्ष एकत्र आले होते, सरकार अकार्यक्षम आहे असा टाहो फोडला जात होता, राफेलची चर्चा उच्चरवाने होत होती, अल्पसंख्य धोक्‍यात आहेत अशी ओरड केली जात होती, हिंदू आणि अन्य असं विभाजन होईल अशी भीती दाखविण्यात आली आणि तरीही नरेंद्र मोदी आणि अमित शहा या जोडगोळीने मैदान मारलेच.

नेमकं काय झालं? अनेकांना हा प्रश्‍न पडला आहे. निकालापूर्वी मतदान यंत्राच्या विश्‍वासार्हतेवर जमेल तितक्‍या खड्या आवाजात आरडाओरड केली होती, देशात अराजकता माजेल अशीही धमकीवजा भीती दाखविली गेली होती. इतकं असूनही भाजपाने जो झगमगता विजय संपादन केला त्याने सगळेच, म्हणजे ओरडणारे, चक्रावून गेले आहेत.

नोटाबंदीमुळे सामान्य माणूस नाडला गेला आहे, जीएसटीमुळे व्यापारीवर्ग नाराज आहे, गोरक्षकांच्या कारवायांमुळे अल्पसंख्य घाबरून गेले आहेत, शेतकरी नाराज आहेत अशी सगळी समर्थनात्मक गणिते मांडणारांना मतदारांनी मात्र चांगलंच हुलकावलं आहे. भाजपाच्या विजयाचे खरे शिल्पकार दोनच आहेत, पहिले म्हणजे नरेंद्र मोदी आणि दुसरे अमित शहा. मोदी ही व्यक्‍ती राहिली नाही. ती एक प्रामाणिक विचारधारा आहे असंच जनमत आहे. मोदींच्या झंझावातापूर्वी देशात जी काही अवस्था निर्माण झाली होती त्यावर देशवासी कधीच समाधानी नव्हते. इतकंच काय पण पाकिस्तान आणि अतिरेकी यांच्याबाबतच्या गुळमुळीत धोरणामुळे तर जनता आतून चिडली होती. सैनिक मरत होते, अतिरेकी हल्ले करत होते, अतिरेक्‍यांनाही सहानुभूती दाखवणारे तथाकथित विचारवंत आणि राजकीय नेते होते.

जनसामान्यांना हवी होती कणखर कारवाई, पण पूर्वीचे सरकार मात्र वेळकाढूपणा करत होते. भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे बाहेर पडत होती. सरकारातले अनेक मंत्री फारसं काही करत नव्हते आणि जे कोणी काही करत होते त्यांच्या कामात पारदर्शकता नव्हती, दूरदृष्टी नव्हती. या देशाला कुणी वाली नाहीच का अशी सुजाण भारतीयांना शंका वाटू लागली होती आणि अनेकांना तर देशाच्या अखंडतेबाबत शंकाच यायला लागली होती. या अशा परिस्थितीत देशाला कुणी तरी तारणहार पाहिजे असं मनोमन सगळ्यांनाच वाटत होतं आणि नेमक्‍या त्याच सुमारास नरेंद्र मोदींसारखा, कोणत्याच व्यक्‍तिगत अपेक्षा नसणारा नेता पुढे आला.

मोदींना ना मूलबाळ ना संसार. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तावून सुलाखून तयार झालेला हा ज्वलंत राष्ट्रभक्‍त देश आणि केवळ देशकल्याण इतकंच ध्येय समोर ठेवून कामाला लागला. लोकांना तेच पाहिजे होतं. मागच्या पाच वर्षांत लोकांनी मोदींच्या कामाचं वेळोवेळी मूल्यांकन केलं आहे. विरोधकांनी जरी वेगळ्या प्रकारे मूल्यांकन करून मोदींचं यश झाकोळून टाकायचं ठरवलं तरी ते सामान्य जनतेला रुचलेलं नाही आणि पटलेलंही नाही. मोदींच्या यशाच्या मागे ही पार्श्‍वभूमी मोठंच काम करून गेली आहे.

नोटाबंदीसारखा निर्णय घेतल्यावर तर अनेकांनी टाहो फोडला. मूर्खपणा आहे, वेडगळ कृती आहे असं बोललं गेलं. पण ओरडणारे केवळ एका विशिष्ट आर्थिक स्तरातले होते. सामान्य माणसाला थोडी अडचण झाली, पण हाल झाले म्हणून जी काही आरडाओरड केली. त्यात पुरेसं तथ्य नव्हतं. या निमित्ताने काही लाख कोटी जे अनेकांच्या तिजोऱ्या आणि कपाटात पडून होते आणि समांतर अर्थव्यवस्थेत होते ते बॅंकिंग चॅनलमध्ये तरी आले आणि अर्थव्यवस्थेत समाविष्ट झाले. विरोधकांनी इथे एक मानसिकता विचारात घेतलीच नाही.

गरीब माणसाला श्रीमंताविषयी कधीच फार मोठा आदर असणार नाही. एक प्रचंड आर्थिक अंतर असल्यामुळे समाजातला एक वर्ग काहीही करू शकतो आणि एक मोठा वर्ग काहीच करू शकत नाही याची साहजिक चीड असणार हे कुणी विचारात घेतलंच नाही. त्यामुळे नोटाबंदीचा परिणाम गरिबांच्या मानसिकतेवर मोदींसाठी सकारात्मकच झाला. तो या निवडणुकीतून दिसला आहे.

मोदींच्या विजयाचा अन्वयार्थ (भाग २)

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)