मोदी-शहांनी जागविल्या आणीबाणीच्या आठवणी

नवी दिल्ली – 25 जून 1975 या दिवशी तत्कालीन इंदिरा गांधी सरकारने देशात आणीबाणी लागू केली होती. भाजप नेहमी आणीबाणीसाठी कॉंग्रेसवर हल्लाबोल करत आला आहे. आज आणीबाणीला 44 वर्ष पूर्ण झाली आहेत. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या कटू आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी ट्‌विटरवर एक व्हिडिओ टाकून आणीबाणीच्या कठीण काळावर भाष्य केले आहे. या व्हिडीओत दडपशाहीचा कठोर काळ दाखविण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींव्यतिरीक्त आणीबाणीची आठवण देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि गृहमंत्री अमित शहांसह अनेक मंत्र्यांनी ट्विटद्वारे करून दिली. कॉंग्रेस सरकारने कशा प्रकारे जनतेवर दडपशाही लादली आणि वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर गदा आणली होती. तसेच राजकीय नेत्यांना कसा त्रास दिला याची आठवण करू दिली. यावेळी गृहमंत्री अमित शहा यांनी लिहिले की आजच्या दिवशी राजकीय हितासाठी लोकशाहीची हत्या करण्यात आली होती.

दरम्यान, आणिबाणीत सरकार विरुद्ध बोलणाऱ्यांना जेलमध्ये टाकण्यात येत होते. तसेच प्रेसवरही मोठ्या प्रमाणात निर्बंध लादली गेली होती. या वेळी राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी सरकारच्या शिफारशीनुसार भारतीय घटनेच्या कलम 352 नुसार देशात आणीबाणी जाहीर केली होती. सुमारे 21 महिने आणीबाणी भारतात लागू करण्यात आली होती. याचा कालावधी 26 जून 1975 ते 21 मार्च 1977 होता.

मागिल पाच वर्षात सुपर इमर्जन्सी – ममता बॅनर्जी
ममता बॅनर्जी यांनी आणीबाणीवरुन थेट मोदी सराकारवर निशाणा साधला आहे. देशात मागील पाच वर्षे आणीबाणीपेक्षाही वाईट म्हणजे “सुपर इमर्जन्सी’ होती असे म्हणत ममतांनी पंतप्रधान मोदींवर आणि मोदींच्या कार्यकाळावर हल्ला चढवला आहे. ममता बॅनर्जी यांनी याविषयी ट्‌विट केले आहे. त्यांनी ट्‌विटमध्ये म्हटले आहे की, 1975 या वर्षी आजच्या दिवशी आणीबाणी जाहीर करण्यात आली होती. देशात मागील पाच वर्षे आणीबाणीपेक्षा वाईट काळ म्हणजे ‘सुपर इमर्जन्सी’ होती. तसेच आपण आपल्या इतिहासातून धडे घेतले पाहिजेत. ज्यामुळे लोकशाहीच्या हितांचे रक्षण करता येणे शक्‍य होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)