नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांना आचारसंहिता भंगप्रकरणी निवडणूक आयोगाने दिलेल्या क्लीन चिटवरून आता आयोगाअंतर्गत नाराजीसत्र सुरु झाले आहे. मोदी-शहांना क्लीन चिट देण्यावरून नाराज निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी आयोगांच्या बैठकीस हजेरी लावणे बंद केले आहे. माध्यमांच्या अहवालानुसार, अशोक लवासा यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहीत आपली नाराजी दर्शवली आहे. यामध्ये अशोक लवासा यांनी त्यांचे मत ऑन रेकॉर्ड दाखवणार नाही तोपर्यंत आयोगाच्या कोणत्याही बैठकीत उपस्थिती लावणार नसल्याचे सांगितले आहे. मी निवडणूक आयोगाच्या बैठकीत सहभागी होऊ नये, यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला होता, असा आरोप त्यांनी केला आहे.
मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्रात लवासा यांनी म्हणाले कि, बहुमताच्या निर्णयांबरोबर अल्पमतात असलेल्यांचे मतही ऑनरेकॉर्ड दाखविले जाईल. त्याचवेळी मी बैठकीला उपस्थित राहील, असे त्यांनी लिहले आहे. त्यांचे मत रेकॉर्डवर दाखविण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांना अनेक स्मरणपत्रे पाठविण्यात आले. परंतु, लवासा यांच्यावरच स्पष्टीकरण न देण्याचा आरोप लावण्यात आला.
पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधातील तक्रारींच्या तपासासाठी एक समिती गठीत करण्यात आली होती. यामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा, अशोक लवासा आणि सुशील चंद्रा यांचा समावेश होता. आचारसंहिता भंगप्रकरणी दोन सदस्यांच्या बहुमताने मोदी-शहांना क्लीन चिट दिली. परंतु, याप्रकरणी अशोक लवासा यांचे मत वेगळे होते. त्यांच्यानुसार मोदी-शहा यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केले होते. तसेच लवासा यांचे मतही ऑनरेकॉर्ड दाखविले नव्हते. यामुळे अशोक लवासा यांनी ४ मेपासून आयोगाच्या बैठकीला हजेरी लावणे बंद केले.