मैभी चौकीदार मोहीमेवर राहुल गांधी यांची टीका
पुर्णिया (बिहार) – कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज येथील एका प्रचार सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मै भी चौकीदार या मोहीमेची खिल्ली उडवली. मोदी हे चौकीदार नसून ते केवळ श्रीमंत आणि धनदांडग्यांच्या बंगल्यावरील गेटकिपर आहेत असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले की आज आपल्या घराच्या बाहेर चौकीदार नेमतो कोण? जे श्रीमंत आहेत तेच चौकीदार नेमतात. गरीबांच्या घराच्या बाहेर तुम्ही कधी चौकीदार पहिला आहे काय असा सवालही त्यांनी केला. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातील राहुल गांधी यांची ही पहिलीच प्रचार सभा होती. ते म्हणाले की मोदींनी अनिल अंबानी, नीरव मोदी आणि मेहुल चौकसी यांच्या सारख्यांचा उल्लेख भाई असा केला आहे आणि तुमच्यासाठी त्यांनी केवळ मित्रो असा उल्लेख केला आहे असे त्यांनी निदर्शनाला आणून दिले.
मोदींनीं गेल्या लोकसभा निवडणूक प्रचारात मोठमोठी आश्वासने दिली पण त्यातील किती आश्वासने त्यांनी पुर्ण केली आणि त्याचा लाभ तुमच्यापैकी किती जणांना मिळाला असा सवालही त्यांनी उपस्थितांना केला. त्या उलट छत्तीसगड, राजस्थान, मध्यप्रदेश या तीन राज्यांत कॉंग्रेस सत्तेवर येताच केवळ पंधरा दिवसांच्या अवधीत कॉंग्रेसने शेतकऱ्यांची कर्ज माफ केली असे त्यांनी निदर्शनाला आणून दिले. कॉंग्रेस सत्तेवर आल्यास या देशातील सर्व कामगारांना किमान वेतन योजना लागू केली जाईल आणि त्यांचे वेतन थेट संबंधीतांच्या खात्यावर जमा केले जाईल.