मोदींनी उद्योग क्षेत्रात पारदर्शकता आणली – राजीव कुमार

भारतातील उद्योग सुलभता वाढली

मुंबई – गेल्या पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने भारतातील उद्योगातील वातावरण आमूलाग्र बदलण्याचा प्रयत्न केला आहे. अगोदर चुकार उद्योगाकडे दुर्लक्ष केले जात होते. ओळखीपाळखीच्या लोकांना झुकते माप दिले जात होते. बडे उद्योग छोट्या उद्योगांना काम करू देत नव्हते. मात्र, आता या सर्व क्षेत्रात केंद्र सरकारने पारदर्शकता आणली असून यामुळे एकूणच उद्योग क्षेत्र झपाट्याने वाढण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर छोटे उद्योग आणि नव्या उद्योगांनाही काम करता येणार आहे, असे निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी सांगितले.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन सायन्सेस या संस्थेच्या पदवीप्रदान समारंभाच्या वेळी बोलताना कुमार यांनी सांगितले की, सध्याचे सरकार उद्योगांसाठी योग्य वातावरण निर्माण करत आहे. त्याचबरोबर स्वतःची जबाबदारीही पुरेशा उत्तरदायित्वाने निभावत आहे. पारदर्शकता आणि कार्यक्षमतेला चालना दिली जात आहे. याअगोदर अशा प्रकारचे वातावरण देशातील उद्योग क्षेत्रात नव्हते. गेल्या पाच वर्षात भारताची स्थूल अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. एक तर भारताचा विकासदर सात टक्‍क्‍याच्यापुढे आहे. हा विकासदर केंद्र सरकारने आपली तूट 3.5 टक्‍क्‍यांच्या आत ठेवून साध्य केला आहे. त्याचबरोबर चालू खात्यावरील तूटही कधीही 2.5 टक्‍क्‍यांच्या वर गेली नाही. याअगोदर विकासदर वाढला तर तूट वाढत असे. गेल्या पाच वर्षात महागाई कमालीच्या कमी पातळीवर आहे. केंद्र सरकारने अतिशय गुंतागुंतीचा जीएसटी बरीच टीका सहन करून अंमलात आणला आहे. त्यामुळे पुढच्या दहा वर्षांत भारताचा विकासदर आठ टक्‍क्‍यांच्या पुढे जाणार आहे असे त्यांनी सांगितले.

भारतातील तरुणांनी नोकरी केंद्री विचार न करता छोटे-मोठे उद्योग सुरू करण्याच्या शक्‍यतेवर विचार करावा. ज्या देशात जास्त उद्योग असतात त्या देशात समृद्धी वाढते. जर उद्योग वाढले नाहीत तर भारत मध्यम उत्पन्न गटाच्या सापळ्यात अडकण्याची शक्‍यता आहे असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

उद्योग आणि सरकारदरम्यानचा समन्वय वाढला आहे. केंद्र सरकार उद्योगाच्या मागण्यांचा तातडीने विचार करून त्यावर निर्णय घेते. बरेच निरुपयोगी कायदे रद्द करण्यात आले आहेत. या सर्वामुळे भारतातील उद्योग सुलभता निर्देशांक मोठ्या प्रमाणात वाढला असल्याची दखल जागतिक बॅंकेनेही घेतली असल्याच्या बाबीकडे त्यांनी लक्ष वेधले. भारतात तरुणांची संख्या जास्त आहे याचा सदुपयोग करण्याची गरज आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)