मोदी सरकारचा फसवा कारभार : गांधी

 कर्ज थकल्यास शेतकऱ्यांना अटक करता येणार नाही, असा कायदा करणार

संगमनेर  –
2 कोटी रोजगार, शेतमालाचे भाव दुप्पट करणार अन्‌ पंधरा लाख रुपये बॅंक खात्यात जमा करण्याचे आश्‍वासन घेवून सत्तेवर आलेले मोदी सरकारने जनतेची फसवणूक केली असून त्यांनी केवळ अनिल अंबानी, मेहुल चोक्‍सी, निरव मोदी, विजय मल्ल्‌या यांच्यावर कर्जांची खैरात केली त्यामुळे मोदी सरकारचा हा फसवा कारभार असून तो जनतेने ओळखला असून त्यांना या निवडणुकीत जनता धडा शिकवेल, असे प्रतिपादन कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले.

शिर्डी लोकसभा मतदार संघातील कॉंग्रेस आघाडीच्या प्रचारासाठी शुक्रवारी रात्री येथील जाणता राजा मैदानावर गांधी यांची सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, माजीमंत्री बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, आमदार सुधीर तांबे, भाऊसाहेब कांबळे, वैभव पिचड, भानुदास मुरकुटे, अविनाश आदिक, सत्यजित तांबे, अनुराधा नागवडे, अनुराधा आदिक, आशुतोष काळे, पांडुरंग अभंग, विनायक देशमुख, राजेंद्र नागवडे, उत्कर्षा रुपवते उपस्थित होते.

गांधी म्हणाले, मोदींनी उद्योगपतींचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज माफ केले. शेतकऱ्यांना कर्ज थकले म्हणून अटक करण्यात येत आहे. कॉंग्रेसचे सरकार आल्यास शेतकऱ्यांना अटक करता येणार नाही असा कायदा करणार आहे. या सरकारने गरिबांना काहीच दिले नाही त्यामुळे गरिबांसाठी काय करता येईल म्हणून आम्ही अर्थतज्ज्ञांबरोबर अभ्यास करुन न्याय योजना बनवली आहे. कॉंग्रेस गरिबांच्या खात्यावर न्याय योजनेतून प्रत्येक महिन्याला 6 हजार रुपये व वर्षाला 72 हजार रुपये टाकणार आहे. 25 कोटी लोक व पाच कोटी कुटुंबांना या योजनेचा फायदा मिळेल. हा आमचा चुनावी जुमला नसून ते वस्तुस्थितीत उतरणार आहे. या योजनेचा अर्थव्यवस्थेवर काहीही विपरित परिणाम होणार नाही. उलट हा पैसा चलनात येऊन वस्तूंची विक्री व उत्पादन वाढेल.

रोजगार निर्माण होतील. सध्या देशात 22 लाख सरकारी पदे रिक्त आहेत या सर्व नोकजया कॉंग्रेस सरकार तरुणांच्या हवाली करणार आहे. 10 लाख तरुणांना पंचायतींमध्ये रोजगार मिळेल कॉंग्रेस सत्तेत आल्यास शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अंदाजपत्रक तयार केले जाईल, असे ते म्हणाले. खर्गे म्हणाले, कॉंग्रेसने शेती, तंत्रज्ञान यात प्रगती केली.पण कॉंग्रेसने काहीच केले नाही, असे मोदी म्हणतात. ही लोकशाही वाचविण्यासाठीची निवडणूक आहे. ही न्याय अन्यायाची निवडणूक आहे. सीबीआय, विद्यापीठ या सारख्या संस्थांमध्ये हस्तक्षेप करत मोदी हे त्यांना हवी ती माणसे या संस्थांमध्ये बसवत आहेत. त्यांना संविधान बदलायचे असून देशात मनुस्मृती आणायची आहे.

चव्हाण म्हणाले, मोदी यांची छाती 56 इंचाची नाही. यांची पोटे वाढली आहेत. शिवसेना ही भाजपपुढे लाचार आहे. सुरेश प्रभूंच्या विमानातील सुटकेसमध्ये काय होते ते कळले पाहिजे. सुटकेसमध्ये आंबे होते की पैसे? निवडणुकीच्या काळात या सुटकेसमध्ये काय आले याचा जनतेला खुलासा हवा आहे. मुख्यमंत्री राहुल गांधींवर टीका करतात तेवढी त्यांची लायकी आहे का? भाजपच्या काळात राज्य अधोगतीला गेले, असे ते म्हणाले. यावेळी पृथ्वीराज चव्हाण, सुशिलकुमार शिंदे, सुधीर तांबे, अविनाश आदिक, वैभव पिचड, विनायक देशमुख, सत्यजित तांबे, आशुतोष काळे आदींची भाषणे झाली. नामदेव कांडाळ यांनी सभेचे सूत्रसंचालन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)