देशात रोजगार समस्या असल्याचे मानण्यास मोदी सरकार तयार नाही : राहुल गांधी

कॉंग्रेस सत्तेवर आल्यास निमलष्करी दलांच्या जवानांना शहीद दर्जा देणार

नवी दिल्ली – देशात रोजगाराची समस्या असल्याचे मानण्यास मोदी सरकार तयार नाही. रोजगारविषयक स्थिती जाणून घेण्यासाठी आणि रोजगार समस्येवर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरूणांशी संवाद साधून त्यांची मते जाणून घ्यावीत, असे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी म्हटले. राहुल यांनी येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर विद्यापीठांतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांना उत्तरे देतानाच विविध मुद्‌द्‌यांवरून मोदी सरकारला लक्ष्य केले. भारतात दर 24 तासांत अवघे 450 रोजगार निर्माण होतात. तेवढ्याच कालावधीत चीनमध्ये तब्बल 50 हजार रोजगारांची निर्मिती होते.

ही आकडेवारी माझी नसून केंद्रीय अर्थ मंत्रालयाने ती लोकसभेच्या पटलावर मांडलेली आहे. आर्थिकदृष्ट्या चीनची वाढ होत आहे. आपल्या देशातील अनेक उत्पादनांवर मेड इन चायनाचे लेबल दिसतात. अर्थात, भारत चीनच्या पुढे जाऊ शकतो याविषयी मला ठाम खात्री आहे, असे राहुल म्हणाले. राफेल, भ्रष्टाचार, रोजगार आणि इतर मुद्‌द्‌यांवर चर्चा करण्याचे आव्हान मी याआधीच मोदींना दिले आहे. पण, ते तुमच्याशी तरी संवाद साधण्यासाठी आले का? स्वत:ची मते तरूणांना न सांगता तरूणांची मते त्यांनी जाणून घ्यायला हवीत. देशाची संपत्ती मोजक्‍या लोकांच्या हाती एकवटली आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अधिक खर्च व्हायला हवा. शिक्षणव्यवस्थेत सुधारणा व्हायला हवी, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रात कॉंग्रेस सत्तेवर आल्यास कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडलेल्या निमलष्करी दलांच्या जवानांना शहीद दर्जा देण्याची ग्वाही राहुल यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)