नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीसाठी आज किरगीजस्तानची राजधानी बिश्केक येथे रवाना झाले. मात्र त्यांचा हा विमान प्रवास पाकिस्तानी हद्दीतून होणार नाही असे विदेश व्यवहार मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. त्याऐवजी ते ओमान, इराण आणि अन्य मध्यअशियाई देशांच्या हवाईहद्दीचा उपयोग करून त्या देशाला जाणार आहेत. आणि त्यांचा परतीचा प्रवासही तसाच असेल असेही या मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
या आधी भारताने पंतप्रधानांच्या विमानासाठी पाकिस्तानी हवाई हद्दीचा वापर करण्यास अनुमती मागितली होंती व त्यासाठी पाकिस्तान सरकारनेही त्यांना तशी तत्वत: मंजुरी दिली होती.परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी सांगितले की पंतप्रधानांच्या विमान प्रवासासाठी आम्ही दोन्ही मार्गांचा पर्याय खुला ठेवला होता त्यामुळे आम्ही पाकिस्तानकडे ही अनुमती मागितली होती. पण आता पाकिस्तानचा मार्ग टाळण्याचाच निर्णय घेण्यात आला आहे. मोदींची ही बिश्केक भेट दोन दिवसांची आहे.