फुलशेतीला आधुनिकतेची जोड : शेतकऱ्यांकडून नावीन्यतेचा ध्यास

– सचिन सुंभे

सोरतापवाडी – पुणे जिल्ह्यातील सोरतापवाडी हे गाव पूर्वीपासून फुलशेतीसाठी प्रसिद्ध आहे. अनेक संकटे आली. परंतु येथील फुलशेती टिकून आहे.पारंपरिक पद्धतीने शेती करत असताना शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करीत आहे. दुष्काळातही या भागातील शेतातील फुलशेतीचा निभाव लागत आहे. फुलशेतीने या भागातील शेतकऱ्यांची आर्थिक घडी बसवली आहे. सण, उत्सवांसाठी फुले पुरविण्यास येथील शेतकरी कायम सज्ज असल्याची प्रचिती परिसरातील फुललेली फूलशेती देत आहे.

पुणे, मुंबई व इतर प्रमुख शहरांना फुले पुरविण्यासाठी येथील शेतकरी प्रयत्नशील असतात. नैसर्गिक आपत्तीला तोंड देत पॉलीहाऊस, शेडनेटमधील फुलांच्या स्पर्धेला तोंड देत येथील पारंपारिक फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांपुढे स्पर्धा वाढली आहे. फुलशेतीसाठी पाण्याचा निचरा होणारी स्वच्छ व भरपूर सूर्यप्रकाशाची जमीन सोरतापवाडी व परिसरात उपलब्ध आहे.

फूलशेतीसाठी पोषक हवामान आणि जमिन असल्यामुळे शहरीकरणाच्या उंबरठ्यावर असलेल्या हवेली तालुक्‍यात ही फूलशेती शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला दिशा देणारी ठरली आहे. आर्थिक संकटे आली तरी शेतकरी पिढ्यान्‌पिढ्या शेती करीत आहेत. परिसरातील शेतकऱ्यांकडून झेंडू, गुलाब, आस्टर, गुलछडी, लिली फुले विकत घेण्यासाठी सणासुदीला फुलबाजारात व्यापाऱ्यांच्या उड्या पडतात. सातशे ते आठशे हेक्‍टरवर फुलशेती केली जात आहे. गुलाबाचे उत्पादन येथे मोठ्या प्रमाणात शेतकरी घेत होते. परंतु लोणी काळभोर येथील एका रासायनिक कारखान्यातील धुरामुळे गुलाबाचे उत्पादन घटले आहे. झेंडू, शेवंती, आस्टरचे उत्पादन शेतकरी घेत आहेत.

शेतकरी गेल्या काही वर्षांपासून दुष्काळाशी लढतो आहे. विहिरी कोरड्या पडल्याने फुलशेतीला टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. मजुरी, तसेच खते व किटकनाशकांचा खर्चही वाढला आहे. पॉलीहाऊस व शेडनेटमधील फुलशेतीमुळे पारंपारिक फुलशेतीला बाजारात खर्चाच्या तुलनेत कमी दर मिळू लागला आहे. जरबेरा, डच, गुलाब यासारख्या फुलांना लग्नसमारंभासाठी मागणी वाढू लागली आहे.

फुलशेती जगवण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक अनुदानाची गरज आहे. तसेच कृषी विभागाने नवीन तंत्रज्ञान विकसित करून पारंपारिक फुलशेती टिकवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
– भाऊसाहेब चौधरी, शेतकरी, सोरतापवाडी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)