मोबाइल कंपन्यांना थकबाकी भरावीच लागेल

अतिरिक्त मुख्य सचिव : कंपन्यांनी मागितली होती दाद

पुणे – महापालिका हद्दीतील मोबाइल कंपन्यांच्या टॉवर उभारणीसंदर्भात राज्यशासनाने नवीन अध्यादेशाद्वारे मोठ्या प्रमाणात सवलती दिल्या आहेत. मात्र, या सर्व कंपन्यांना महापालिकांची मिळकतकराची थकबाकी भरावीच लागणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्यसचिव डॉ. प्रवीणसिंह परदेशी यांनी याबाबतच्या सूचना मोबाइल कंपन्यांना केल्या आहेत.

मोबाइल कंपन्यांच्या टॉवर बाबत राज्यशासनाच्या आदेशानंतरही महापालिकाकडून कंपन्यांची जुनी थकबाकी असल्याने नव्याने देण्यात आलेल्या सुविधा तसेच योग्य ते सहकार्य मिळत नसल्याची तक्रार मोबाइल कंपन्यांची संस्था “तैपा’ (टॉवर ऍन्ड इन्फ्रास्ट्रक्‍चर प्रोव्हाइडर असोसिएशन) ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेत डॉ. परदेशी यांनी दोन दिवसांपूर्वी संबंधित महापालिका आणि मोबाइल कंपन्यांच्या प्रतिनिधींची व्हिडिओ कॉन्फरन्सवर बैठक घेतली. यावेळी हे पैसे कंपन्यांना भरावे लागणार असल्याचे स्पष्ट केले.

मोबाइल कंपन्यांनी महापालिकेच्या मिळकतकराचा सुमारे 552 कोटींचा कर थकविला आहे. त्यामुळे बांधकाम विभागाकडून थकबाकी असलेल्या कंपन्यांना टॉवर उभारणीसाठी नव्याने परवानगी दिली जात नाही. त्यातच, राज्यशासनाने जानेवारी 2018 मध्ये मोबाइल टॉवर उभारण्यासाठी नवीन सवलती दिल्या आहेत. असे असले, तरी थकबाकी असलेल्या पालिकांकडून या कंपन्यांना या सवलती दिल्या जात नाहीत. त्यामुळे या कंपन्यांनी शासनाकडे तक्रार केली होती.

त्यावर चर्चा करण्यासाठी डॉ. परदेशी यांनी नुकतीच बैठक घेत महापालिकांची बाजूही जाणून घेतली. यावेळी कंपन्यांना वेळोवेळी सूचना देऊनही त्या थकबाकी भरत नसल्याबाबत पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मुद्दा उपस्थित केला. यावेळी डॉ. परदेशी यांनीही महापालिकेची बाजू ग्राह्य धरत आधी कंपन्यांनी थकबाकी भरणे अपेक्षित असल्याचे स्पष्ट केले. तसेच ज्या थकबाकीबाबत वाद असतील ती बाजूला ठेवून नियमानुसार,असलेली थकबाकी भरावी अशा सूचना कंपन्यांना केल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)