मोबाईलच्या व्यसनामुळे मेंदूची गतीशीलता कमी

मोबाईल व्यसनाधीनता भाग – 1 
पबजी, यु ट्‌युब, ऑनलाईन गेम्सने व्यापलाय मेंदूचा मोठा भाग

अर्जुन नलवडे

पुणे – तुम्ही मोबाइलवर सारखे चॅटिंग करता का… तुम्हाला सेल्फी किंवा फोटो काढावा अन्‌ तो सोशल मीडियावर अपलोड करावा, असे वाटते का… तुम्हाला सातत्याने वेगवेगळे गेम्स खेळावेसे वाटतात का… तुम्हाला युट्यूब किंवा इतर सोशल मीडियावरचे व्हिडीओ पाहण्यात आनंद वाटतो का… मोबाइल नसल्यामुळे तुम्हाला त्रास होतो का… या प्रश्‍नांची उत्तरे जर हो’ असतील, तर तुम्ही इंटरनेट व्यसनाच्या विळख्यात अडकला आहात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सध्या प्रत्येक जण मोबाइल वापरतो आहे. त्याचे परिणाम लहान मुलांपासून महिला, ज्येष्ठ नागरिकांपर्यंत दिसू लागले आहेत. राज्यातील प्रथमच आणि पुण्यात स्थापन झालेल्या इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्रात दिवसेंदिवस मोबाइल ऍडिक्‍ट’ असणाऱ्या व्यक्ती भरती होताहेत. तसेच त्यासंबंधी मुलांच्या मोबाइल वापरण्याचा विचारणा करणाऱ्या पालकांचे टेलिफोनही दिवसेंदिवस खणाणताहेत.

कुठे तरुणींचे सोशल मीडियावर टाकलेले वेडेवाकडे फोटो पाहून काही मुलींची ठरलेली लग्ने मोडली आहेत. तर, कुठे पत्नी रात्रीच्यावेळी कोणासोबत चॅटिंग करते, या संशयावरून संसार उद्‌ध्वस्त झालेली आहेत. तर, कुठे 15 वर्षीय मुलगा 11-11 दिवस स्वतःला बंद खोलीत कोंडून घेऊन पब-जी’ गेम खेळण्यात गुंतला आहे. तर, कुठे ज्येष्ठ नागरिक बागेत फिरताना व्हॉट्‌सऍपवर आलेल्या अश्‍लिल चित्रफिती पाहून चर्चा करताहेत, तर कुठे अनाठायी खर्च करत इंटरनेट शॉपिंग करण्यात महिला गुंतल्या आहेत, अशी अनेक प्रकरणे सध्या मोबाईल ऍडिक्‍ट’ची उदाहरणे म्हणून पुढे येताना दिसत आहेत.

यासंदर्भात मनोविकास मानसोपचार केंद्राचे डॉ. अजय दुधाणे सांगतात की, साधारणपणे 2012 नंतर मोबाइलचे वेड लोकांमध्ये जास्त वाढले. पुढे-पुढे मोबाइलची लेटेस्ट व्हर्जन्स आली. तसेच फोर-जी स्पीड इंटरनेट उपलब्ध झाले. हे सर्व लोकांच्या खिशाला परवडेल या किमतीमध्ये मिळू लागले. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सहजपणे प्रत्येकजण मोबाइल वापरू लागला. मोबाइलमध्ये विविध अनावश्‍यक गोष्टी सहज उपलब्ध झाल्या. परिणामी, प्रत्येक जण आभासी जगात वावरू लागला आहे. ते आभासी जगच प्रत्येकाला आपले वाटू लागले आहे.

इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्रातील वास्तव

आतापर्यंत नोंदविलेल्या आकडेवारीनुसार सर्वात जास्त मोबाइल व्यसनाधीनतेमध्ये अडकलेला तरूण वर्ग आहे. तो 16 ते 25 या वयोगटातील आहे. त्यामध्ये 70 टक्के तरूण, इन्साग्राम, युट्यूब आणि पब-जी गेम्स खेळण्यात बिझी आहेत. तर, 90 टक्के तरूण व्हाट्‌सअप आणि फेसबुकवर व्यस्त असतात. त्याचबरोबर 35 टक्के मुले ही टिव्ही पाहताना मोबाईल वापरतात, हे दिसून आलेले आहे. मागील 15 दिवसांमध्ये दाखल झालेल्या तक्रारींमध्ये जास्त संख्या ही 11 वी चे विद्यार्थी मोबाईलमुळे कॉलेजला जात नसल्याची आढळून आले आहे. तसेच 4 तरुणींचे विवाह सेल्फीमुळे मोडलेले आहेत, असे निदर्शनास आले आहे. 

इंटरनेट वापरणे, वाईट नाही. मात्र, त्यासाठी ठराविक आणि मर्यादित वेळ देणे आवश्‍यक आहे. इंटरनेटच्या अतिवापरामुळे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ बिघडत आहे. लहान मुले आणि तरुणांमध्ये इंटरनेटचा वापर जास्त होत असल्यामुळे मेंदूच्या विकासात अडचणी येतात. आयुष्यातील गुणात्मक वेळ संवाद, संशोधन, खेळ, व्यायाम, लेखन यासाठी दिला पाहिजे. इंटरनेटची सवय मोडायची असेल, तर व्यायाम करणे, एखादा छंद जोपासणे, योगा करणे, असे उपाय करायला हवेत.

– डॉ. आमोद बोरकर, मनोविकार व मानसोपचार तज्ज्ञ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)