पिंपरी-चिंचवड शहर मनसेच्या आघाडीवर संभ्रमावस्था

आघाडीबाबत अनिश्‍चितता; लोकसभा निवडणुकीबाबत कार्यकर्ते सैरभैर

पिंपरी  – सर्वच पक्षांनी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी चालविलेली असताना पिंपरी-चिंचवड शहर पातळीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मात्र अद्यापही संभ्रमावस्था आहे. कॉंग्रेस राष्ट्रवादीसोबत आघाडी होणार की नाही याबाबत अनिश्‍चितता असतानाच पक्ष लोकसभा लढविणार की नाही याबाबत कोणताच निर्णय नसल्याने कार्यकर्ते सैरभैर असल्याचेच चित्र दिसून येत आहे.

जनाधार संपण्याची शक्‍यता

महापालिका निवडणुकीत केवळ एक नगरसेवक या पक्षाचा निवडून आला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शहर पातळीवर या पक्षाकडून योग्य तो निर्णय घेवून कार्यकर्त्यांना उभारी न दिल्यास शहरात असलेला थोडाफार जनाधारही हा पक्ष येत्या निवडणुकीत गमावून बसेल, असे बोलले जात आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शहरातील परिस्थिती तशी नगण्यच आहे. महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत या पक्षाचा विशेष असा दरारा निर्माण करण्यात स्थानिक नेते कधीच यशस्वी झाले नाहीत.

वरिष्ठांकडून शहरातील कार्यकर्ते व नेत्यांना कधीच ताकद न मिळाल्याने पक्षाची वाढ सुरूवातीपासूनच जेमतेम आहे. काही पदाधिकारी पक्ष वाढीसाठी प्रयत्न करताना दिसून येत असले तरी पक्षाला सुगीचे दिवस आणू शकेल असा सक्षम नेता सध्यातरी या पक्षाकडे नाही. भोसरी, पिंपरी आणि चिंचवड मतदारसंघात काही ठिकाणी स्थानिक पातळीवरील नेत्यांनी आपल्या परिसरामध्ये स्वत:च्या ताकदीवर काही प्रमाणात वर्चस्व ठेवले आहे. विजय मिळविण्याएवढी या नेत्यांची ताकद नसली तरी विजयी कोणाला करायचे यामध्ये हातभार लागेल एवढी तरी ताकद हे नेते आपल्या मतदार आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ठेवत असल्यामुळे मनसेची काय भूमिका असणार याबाबत राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत.

गतवेळच्या निवडणुकीत मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठींबा दिला होता. तर मावळ मतदारसंघात शेकापचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्यासाठी जाहीर सभा घेत वातावरण निर्मिती करण्यात जगताप यांना साथ दिली होती.

पक्षीय पातळीवर गट-तट

नगण्य स्थान, नवे चेहरे, मतदार आणि कार्यकर्त्यांची मोजकी संख्या अशी परिस्थिती असतानाही जे पदाधिकारी आहेत त्यांच्या एकवाक्‍यता कधीच दिसून आली नाही. भोसरी, पिंपरी आणि चिंचवड या तिनही विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांमध्ये एकवाक्‍यता दिसून येत नाही. त्यामुळे पक्ष वाढीपेक्षा पक्षाला अडचणीत आणण्यासाठीच काहीजण कार्यरत आहेत. गट-तटाचाही परिणाम या पक्षाच्या वाढीवर आजपर्यंत झाला आहे.

तात्कालीन निवडणुकीत मनसेच्या कार्यकर्त्यांनी जगताप यांच्या पाठीशी ताकद उभी केल्यामुळे निवडणुकीत रंगत आली होती. यावेळी मात्र राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधी भूमिका घेतली आहे.

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडीची चर्चा सध्या जोरात रंगली आहे. कॉंग्रेसकडून मात्र या आघाडीबाबात विरोध दर्शविला जात आहे तर राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी आघाडीत मनसेला घेण्याबाबत अनुकूलता दर्शविली आहे.

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीकडून मनसेबाबत वेगवेगळी भूमिका घेतली जात असल्याने सर्वसामान्य कार्यकर्ता या अनिश्‍चिततेच्या वातावरणात भरकटला आहे. एकंदरीत शहरात असलेले नगण्य स्थान त्यातच अनिश्‍चित वातावरण आणि वरिष्ठांची स्थानिकांना मिळत नसलेली साथ यामुळे पक्षाची शहरातील स्थिती भरकटलेलीच आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)