“भूमी अभिलेख’च्या विरोधात मनसे आक्रमक

फलटण – येथील भूमी अभिलेख कार्यालयात शेतकरी, नागरिकांवर अन्याय करणारी मुजोरी सुरू आहे. नागरिकांना वेठीस धरुन आर्थिक लूट करण्यात माहीर असलेल्या भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी कामासाठी दलाल ठेवून त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करीत आहे. त्यामुळे शेतकरी चांगलेच हवालदिल झाले आहेत. अनेक नियमबाह्य मोजणी कामे उपअधीक्षक जवक करत आहेत. त्यांची खातेनिहाय सखोल चौकशी करून त्यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी मनसेचे युवराज शिंदे यांनी मुख्यमंत्री, महसूल मंत्री यांच्याकडे केली आहे. याबाबत चौकशी न झाल्यास आमरण उपोषण करणार असल्याचा इशाराही मनसेकडून देण्यात आला आहे.

युवराज शिंदे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भूमी अभिलेख कार्यालय उपअधीक्षक शिल्पा जवक यांचा कार्यालयावर कसलाही अंकुश नसून अधिकृत कामेही विनाकारण अडवून ठेवली जातात. अनेक अनधिकृत खाजगी कर्मचारी त्यांनी ठेवले असून अनधिकृत कामे करण्यासाठी त्यांचा वापर केला जातो, शासकीय दस्त ऐवज अनधिकृत खाजगी कर्मचारी हाताळत आहेत, अनेक दलालांचा सुळसुळाट केला असून त्यांना हाताशी धरल्याशिवाय कामे होत नाही, उपअधीक्षक हे स्वतः उद्धट वर्तन करत असतात.

जेव्हापासून जवक यांनी पदभार घेतला आहे तेव्हा पासून खासगी कर्मचारी, दलाल यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. वृद्ध शेतकऱ्यांना कार्यालयात ताटकळत उभे ठेवले जात आहे, कार्यालयातील शिपाई नकला तयार करण्याचे काम करत असून शिपाई यांना तांत्रिक ज्ञान नसतानाही नक्कल तयार करण्याचे नियमबाह्य काम करत आहेत. अनेक नकलेचे व मोजणीचे अर्ज प्रलंबित असून आर्थिक देवाणघेवाण करणाऱ्यास नागरिकांना प्रवृत्त केले जात असून पैसे दिल्याशिवाय काम होत नाही. उपअधीक्षक हे आपल्या पदाचा दुरुपयोग करत असल्याने त्यांच्या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना मोजणी कामासाठी वारंवार त्रास देत असल्याने शिल्पा जवक यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी जिल्हा अधीक्षक यांच्याकडे केल्या आहेत तरी त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने लवकरच आमरण उपोषण करण्याचा इशारा युवराज शिंदे यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)