…अन्‌ पंकजा मुंडे मंत्रालयात प्रगटल्या

आमदार रामराव वडकुते रोखला मार्ग

मुंबई: धनगर समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय मंत्रालयात पाऊल ठेवणार नाही, अशी राणा भीमदेवी थाटात घोषणा करणाऱ्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी धनगर समाजाची फसवणूकच केली आहे. त्यांनी घोषणा करून चोवीस तासही उलटत नाही तोच पंकजा मुंडे यांनी आज मंत्रालयात प्रगटल्या. परंतु, धनगर समाजाचे आमदार रामराव वडकुते यांनी त्यांना मंत्रालयाच्या इमारतीच्या प्रवेशद्वारावरच रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपण असे बोललो नसल्याचे सांगत आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या.

पंकजा मुंडेंचा घुमजाव
मंत्रिमंडळाच्या बैठकीतून बाहेर पडताना माध्यमांनी त्यांना त्यांच्या वक्तव्याबाबत विचारणा केली असता पंकजा मुंडे म्हणाल्या, माळेगावच्या यात्रेत मी म्हणाले की, 2014 साली धनगर समाजाच्या पाठिंब्यावर आपले सरकार स्थापन झाले आहे. त्या समाजाला आरक्षण दिल्याशिवाय पुन्हा आम्ही सत्तेत येऊ शकणार नाही. आरक्षण दिल्याशिवाय मंत्रालयात आम्हाला बसता येणार नसल्याचा खुलासा त्यांनी केला. तसेच मी मागासवर्गीय, शोषित पीडित समूहाचे प्रतिनिधित्व करते. त्यामुळे मंत्रालयात आल्याशिवाय त्यांच्याबाबत मी काम कसे करू शकते? असा प्रतिसवालही त्यांनी प्रसारमाध्यमांना केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नांदेड जिल्ह्यातील माळेगावच्या खंडोबा यात्रेत लाखो धनगर समजाबांधवासमोर बोलताना पंकजा मुंडे यांनी जोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण मंत्रालयातील दालनात पाऊल ठेवणार नाही, अशी घोषणा त्यांनी केली होती. आज, मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक होती. त्यामुळे मुंडे येणार कि नाही, अशी मंत्रालयात चर्चा होती. मात्र, सकाळीच त्या मंत्रालयात आल्या.

त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार व धनगर समाजाचे नेते रामराव वडकुते यांनी त्यांना मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारावर त्यांचा मार्ग रोखून धरला. परंतु मुंडे यांनी लोकांची कामे कोण करणार, मी परत जायचे का? असा प्रतिप्रश्न करत धनगर समाजाच्या सभेत मी असे बोललेच नसल्याचा खुलासा वडकुते यांच्यासमोर केला.

वडकुते यांनी मला रोखण्यापेक्षा गेल्या 70 वर्षांत जे आरक्षण देउ शकले नाहीत त्यांना रोखावे. ज्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वडकुते आमदार आहेत त्यांनी धनगरांना आरक्षण का दिले नाही याचे उत्तर त्यांनी द्यावे. मला रोखण्याने जर धनगरांना आरक्षण मिळणार असेल तर खुशाल रोखा असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)