आमदार कुलकर्णी यांच्या घरासमोर मराठा आंदोलकांची निदर्शने

पुणे – मराठा समाजास आरक्षण मिळावे, यासाठी आंदोलकांनी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या निवासस्थानासमोर शुक्रवारी निदर्शने केली. निवेदन स्वीकारण्यासाठी आमदार कुलकर्णी यांनी घराबाहेर यावे, यासाठी अडून बसलेल्या सुमारे 60 आंदोलकांना अलंकार पोलिसांनी ताब्यात घेतले. थोड्या वेळाने त्यांची सुटका करण्यात आली. आंदोलनादरम्यान काहींनी मुंडनही केले.

मराठा समाज आरक्षणासाठी राज्यभर आंदोलने सुरू आहेत. त्याचा एक भाग म्हणून राज्यातील आमदार, खासदारांच्या घरासमोर निदर्शने करण्यात येत आहेत. शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आमदार कुलकर्णी यांच्या कोथरूडमधील डहाणूकर कॉलनी, गल्ली क्र.8 येथील नंदनवन अपार्टमेंट सोसायटीसमोर सुमारे 60 आंदोलकांनी निदर्शने केली. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच आमदार कुलकर्णी यांनी स्वत: निवेदन घ्यावे, असा आग्रह धरला. मात्र, निदर्शने सुरू करून एक ते दीड तास होऊनही त्यांनी निवेदन घेतले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी सोसायटीत घुसण्याचा प्रयत्न केल्याचे घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी सांगितले.

आंदोलनादरम्यान, काही कार्यकर्त्यांनी मुंडन करून निषेध व्यक्त केला. यावेळी आंदोलकांनी रस्ता अडवून धरला होता. डेक्कन विभागाचे पोलीस सहायक आयुक्त बाजीराव मोहिते आणि अलंकार पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आंदोलकांचे निवेदन पोलिसांनी स्वीकारले. निदर्शने करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले तसेच पोलीस व्हॅनमधून अलंकार पोलीस ठाणे येथे घेवून जात त्यांना सोडून देण्यात आले.

दरम्यान, या आंदोलनाबाबत आमदार मेधा कुलकर्णी यांनी गुरूवारी कथित वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संताप होता. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतरही आमदार कुलकर्णी यांच्या घरासमोर सहायक पोलीस निरीक्षक आणि कर्मचारी तळ ठोकून होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)