उमेदवारीसाठी आमदार जगताप पिता-पुत्रांमध्ये चुरस ; राष्ट्रवादीत उमेदवारी कोडे सुटेना

तरुणाबरोबर तरुणाची लढत व्हावी म्हणून संग्राम जगतापांचे नाव

नगर: अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारासंघाची जागा प्रतिष्ठेची केलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला अद्यापही उमेदवाराचे कोडे सोडविता आलेले नाही. दररोज एक नाव पुढे येवून त्यावर शिक्‍कामोर्तब होत नाही तोच दुसरा उमेदवाराचे नाव चर्चेत येत आहे. भाजपचा उमेदवार निश्‍चित झाला तरी राष्ट्रवादीकडून उमेदवाराचा शोध काही संपला नाही. गेल्या आठ ते दहा दिवसात चर्चेत असलेली सर्वच नावे आता मागे पडली असून आमदार अरूण जगताप यांचे नाव निश्‍चित होत असतांनाच त्यांचे सुपुत्र आमदार संग्राम जगताप यांचे नाव आता आघाडीवर आले आहे. आज मुंबईत दिवसभर आ. संग्राम यांच्या नावाचा बोलबाला होता. तरूणाबरोबर तरूणच हवा म्हणून आ.संग्राम यांचे नाव आल्याने आता उमेदवारीसाठी आमदार पिता-पुत्रांमध्ये चुरस निर्माण झाली आहे.

राष्ट्रवादीने लोकसभेसाठी उमेदवार निश्‍चितीला गेल्या दोन अडीच महिन्यांपासून सुरूवात केली आहे. लोकसभा निवडणूक जाहीर झाली तरी उमेदवाराचा शोध काही संपला नाही. त्यामुळे सध्या तरी जिल्ह्यात राष्ट्रवादीचे हसू झाले असल्याचे दिसत आहे. कॉंग्रेसला ही जागा न सोडण्याबरोबर या जागेसाठी आग्रही असलेले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या सुपुत्र डॉ. सुजय यांना राष्ट्रवादीकडून देखील उमेदवारी देण्यास नकार देण्यात आला. एवढी ही जागा राष्ट्रवादीने प्रतिष्ठेची केली आहे. चार महिन्यापूर्वी झालेल्या बैठकीत आ. अरूण जगताप यांच्या नावावर शिक्‍कामोर्तब झाले होते. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी पाहून गेल्याने अनेक नावे चर्चेत आले.

माजी आमदार नरेंद्र घुले, दादा कळमकर, प्रताप ढाकणे हे इच्छूक असतांना त्याचा विचार करून माजी कुलगुरु सर्जेराव निमसे, यशवंत प्रतिष्ठाणचे अध्यक्ष प्रशांत गडाख, प्रदेश महिला कॉंग्रेसच्या सरचिटणीस व महिला व बालकल्याणच्या सभापती अनुराधा नागवडे यांची नावे पुढे आली. नागवडे याचे नाव निश्‍चित करून त्यांचा पक्षप्रवेश देखील ठरला. परंतू अचानक त्यांचा प्रवेश लांबणीवर टाकण्यात आला. गेल्या चार दिवसांपूर्वी प्रशांत गडाख यांचे नाव निश्‍चित मानले जात होते. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अप्रत्यक्षरित्या 1991 च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार असल्याचे जाहिर करून भाजपच्या डॉ. सुजय विखे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे प्रशांत गडाख अशी लढत होणार असल्याचे चित्र दिसत होते.

गेल्या दोन दिवसापूर्वी गडाख यांचे नाव मागे पडून आ. अरूण जगताप यांचे नाव पुढे आहे. त्यात आता गडाख यांनी तलवार मान्य केल्याने आ.जगताप यांचे नाव निश्‍चित मानले जात असतांना आज मुंबईत आ. जगताप यांचे सुपुत्र आ. संग्राम याचे नावावर प्रसंती देण्यात आली आहे. विरोधी भाजपचा उमेदवार तरूण असल्याने आपलाही उमेदवार तरूण असावा. असा मतप्रवाह पुढे आल्याने आ. संग्राम यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. परंतू आ. संग्राम यांच्या नावाला त्यांच्या पिता आ. अरूण जगताप यांचा विरोध आहे. घरात भांडणे लावता का असा सवाल यांनी मुंबईच्या बैठकीत केला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे नेतेही द्विधामनस्थितीत सापडले आहे. आ. अरूण जगताप स्वतःच्या उमेदवारीसाठी आग्रही असतांना नेत्यांनी मात्र आ. संग्राम यांचे नाव पुढे केले आहे.

अर्थात वडीलांच्या उमेदवारीसाठी आ. संग्राम हे प्रयत्नात होते. पक्षाचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड, आमदार राहुल जगताप यांच्या सहकार्याने आ. संग्राम यांनी आ. अरूण जगताप यांचे नाव उमेदवारीसाठी निश्‍चित देखील केले होते. पण आजच्या बैठकीत आ. संग्राम यांचे नाव पुढे आल्याने त्यांची डोकेदुखी वाढली आहे. यासर्व घडामोडीमुळे आ अरूण जगताप यांच्या घरात वाद रंगण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. कारण त्यांचे मोठी सुपुत्र सचिन जगताप हे देखील लोकसभेसाठी इच्छुक आहे. पण त्याचे नाव कोठेच येत नाही.

दुसरीकडे महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने आ. संग्राम जगताप व डॉ. सुजय विखे हे चांगलेच मित्र झाले होते. लोकसभेच्या निवडणुकीत सर्वतोपरी मदत करण्याचे या दोघात ठरले होते. पण आता आमदार जगताप पिता-पुत्रापैकी एकाच नाव राष्ट्रवादीकडून निश्‍चित झाल्यानंतर डॉ. विखे यांना मित्राशी कडवी झुंज द्यावी लागणार आहे. यापूर्वी लोकसभेसाठी आ. जगताप व विखे यांनी ठरविलेले गणित बिघडणार आहे. त्यामुळे विखेंना शिवसेनेची मदत घेण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. दरम्यान, आमदार जगताप पिता-पुत्रांमध्ये उमेदवारीसाठी चुरस निर्माण झाल्याने राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर करण्याची प्रक्रिया थांबविली असून उद्या दुपारनंतर उमेदवार जाहीर करण्याचे ठरले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)