पुणे – सत्ताधाऱ्यांकडून पोलीस यंत्रणेचा गैरवापर

जलपर्णी विषयात थेट राधाकृष्ण विखे पाटील यांची वार्ताहर परिषद : सत्ताधाऱ्यांवर टीका

पुणे – नुकतेच महापालिकेत गाजलेल्या जलपर्णी प्रकरणात सत्ताधारी भाजपकडून पोलीस यंत्रणेचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आघाडी जाहीर केल्यानंतर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने जलपर्णी प्रश्‍नांत प्रथमच एकत्रित वार्ताहर परिषद आयोजित केली होती. यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, आमदार शरद रणपिसे, माजी आमदार मोहन जोशी आणि बाळासाहेब शिवरकर, जयदेव गायकवाड, नगरसेवक अरविंद शिंदे, अजित दरेकर आदी उपस्थित होते.

महापालिकेने जलपर्णी काढण्यासाठी चोवीस कोटी रुपयांच्या निविदा मागवल्या होत्या. त्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा संशय आल्याने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक महापौरांकडे जाब विचारण्यासाठी गेले होते. त्यावेळी महापौर दालनात वाद झाला आणि जो प्रकार घडला त्याचे समर्थन करत नाही; परंतु अधिकाऱ्यांकडून जी वर्तणूक केली गेली ती समर्थनीय नाही, असे विखे-पाटील म्हणाले.

झालेल्या वादासंदर्भात शहराध्यक्षांकडून अहवाल मागवला आहे. पक्षीय पातळीवर त्याची चौकशी होईलच; परंतु कॉंग्रेसच्या नगरसेवकांच्या घरी चाळीस पोलिसांचा ताफा पाठवून त्यांना गुन्हेगारासारखी वागणूक दिल्याचा आरोपही विखे-पाटील यांनी केला.

अशाप्रकारे पोलिसांची अरेरावी ही निषेधार्ह असून, ते कोणाच्या सांगण्यावरून असे वागतात, असा सवाल उपस्थित करून मुख्यमंत्र्यांनी याची चौकशी करावी, अशी मागणीही विखे-पाटील यांनी केली.

विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर बोलताना “आम्ही लवकरच सत्तेत येणारच आहोत’, असा इशाराही विखे-पाटील यांनी यावेळी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)