चंद्रकांत पाटलांचे मिशन (अग्रलेख)

लोकसभा निवडणुकीत दारुण पराभवाचा फटका बसलेल्या कॉंग्रेसने महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची नियुक्‍ती केल्यानंतर आता भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. थोरात यांनी नियुक्‍ती झाल्यानंतर राज्यात यावेळी आघाडीचेच सरकार येईल असा विश्‍वास व्यक्‍त केला होता, तर चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी “अबकी बार 220 पार’ असा नारा असल्याचे जाहीर केले आहे. सर्व जबाबदाऱ्यांना मी न्याय देऊ शकेल हे गृहीत धरूनच पक्षाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे माझा देखील सर्व जबाबदाऱ्यांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या काळात अध्यक्षपदाची जबाबदारी असलेले रावसाहेब दानवे यांनी केंद्रात मंत्रिपद मिळाल्याने राजीनामा दिल्याने त्यांच्या जागी चंद्रकांत पाटील यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाकडे लक्ष देण्यासाठी पूर्णवेळ अध्यक्ष असणेदेखील गरजेचे असल्याने दानवे यांच्या जागी पाटील यांची नियुक्‍ती करण्यात आली असल्याचे सांगण्यात येते. अर्थात, या नियुक्‍तीमागे काही राजकारण असण्याचीही शक्‍यता नाकारता येत नाही. मुळात पाटील मंत्रिपदावर समाधानी आहेत आणि त्यांना प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा नाही, अशा बातम्या मध्यंतरी येत होत्या, तरीही त्यांच्याच गळ्यात प्रदेशाध्यक्षपद टाकून देवेंद्र फडणवीस यांनी आपला आणखी एक मुख्यमंत्रिपदासाठीचा पक्षांतर्गत विरोधक बाजूला केला आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

भाजपच्या धोरणाप्रमाणे “एक व्यक्‍ती एक पद’ हा नियम पाळून चंद्रकांत पाटील मंत्रिपदाचा राजीनामा देतात का, हे आता पाहावे लागेल. अर्थात, केंद्रात अमित शहा यांनी आपल्याकडे अध्यक्षपद ठेवून मंत्रिपदही स्वीकारले असल्याने तोच नियम चंद्रकांत पाटील यांनाही लागू होऊ शकतो. राज्य सरकारमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चंद्रकांत पाटील यांना आता संघटन जबाबदारी दिल्याने ते एका अर्थाने फडणवीस यांना समकक्ष होतात. कारण भाजपमध्ये मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्याएवढेच अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष यांना महत्त्व असते. जरी लोकसभा निवडणूक फडणवीस यांच्या चेहऱ्यावरच लढवली गेली तरी आता विधानसभा निवडणुकीत फडणवीस आणि पाटील हे दोन चेहरे वापरले जातील असेच संकेत मिळत आहेत. अर्थात, मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार फडणवीस हेच असतील पण निवडणूक जिंकण्याची जबाबदारी दोघांवर असेल.

राज्यात यावेळी 220 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा इरादा पाटील यांनी बोलून दाखवला आहे. फडणवीस यांनीही गेल्या महिन्यात हाच इरादा बोलून दाखवला होता. साहजिकच हे मिशन पूर्ण करण्यासाठी पाटील यांना आगामी काळात मोठे प्रयत्न करावे लागतील. मुळात 220 हा आकडा भाजप आणि शिवसेना यांचा मिळून आहे का फक्‍त भाजपचा आहे हे प्रथम स्पष्ट करावे लागेल. केंद्रात भाजपने गेल्यावेळपेक्षा 22 जागा जास्त जिंकून 303 चा टप्पा गाठला होता. महाराष्ट्रात भाजपच्या 123 जागा आहेत त्यामुळे 220 जागांचे मिशन भाजपला शिवसेनेच्या सहकार्यानेच पार करावे लागणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप-सेना युतीने राज्यातील 48 जागांपैकी 41 जागा जिंकल्या होत्या. एका लोकसभा मतदारसंघात सामान्यपणे विधानसभेचे 5 मतदारसंघ असतात, असे गृहीत धरले तर लोकसभेच्या निकालावर आधारित राज्यात युतीने विधानसभेच्या 200 पेक्षा जास्त मतदारसंघात बाजी मारली असल्याचे चित्र दिसते. याच गणिताच्या आधारे पाटील आणि फडणवीस यांनी “मिशन 220’ची घोषणा केली असेल. तरीही हे “मिशन 220′ पूर्ण करण्यासाठी युतीला प्रचंड परिश्रम करावे लागणार आहेत हे विसरून चालणार नाही.

अर्थात, युतीत आता कोणतेही मतभेद नसल्याने दोघेही एकदिलाने लढतील यात शंका नाही; पण शिवसेनेला शांत ठेवण्याचे काम पाटील यांना फडणवीस यांच्या मदतीने करावे लागणार आहे. कारण मुख्यमंत्री कोण होणार, या विषयाला आता शिवसेना पुढे आणत आहे. फडणवीस आणि उद्धव ठाकरे सतत “आमचे ठरलंय’, असे सांगत असले तरी काय ठरलंय याचा कोणालाच अंदाज नाही. त्यामुळे या एका विषयावरून युतीत मतभेद वाढणार नाहीत याची काळजी आगामी काळात पाटील यांना घ्यावी लागेल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजपला आपल्या इतर मित्रपक्षांनाही सांभाळावे लागेल. लोकसभा निवडणुकीत भाजपने एकही मित्रपक्षाला जागा दिली नव्हती; पण विधानसभा निवडणुकीत भाजपला महादेव जानकर, सदाभाऊ खोत, रामदास आठवले आणि विनायक मेटे यांच्या पक्षांचा विचार करावाच लागेल. या पक्षांना जागा दिल्या तर भाजपचे “मिशन 220′ अधिक सोपे होणार आहे; पण या पक्षांशी जागावाटपाच्या वाटाघाटी करताना पाटील यांचा कस लागणार आहे.

आतापर्यंत पश्‍चिम महाराष्ट्राला केंद्रित ठेवून राजकारण करणाऱ्या पाटील यांना राज्याचे राजकारण करावे लागणार आहे. शिवसेना आणि मित्रपक्षांना सांभाळण्याची जबाबदारी त्यांनाच घ्यावी लागणार आहे. मुख्य म्हणजे फडणवीस यांच्यापेक्षा भिन्न प्रतिमा त्यांना उभी करावी लागणार आहे. दानवे यांचा कारभार तसा सामान्यच होता. कारण मुख्यमंत्री फडणवीस प्रभावी होते. दानवे यांनी आपली प्रतिमा प्रभावी करण्यासाठी प्रयत्नही केले नव्हते; पण पाटील महत्त्वाकांक्षी असल्याने ते फडणवीस यांच्या प्रभावळीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतील असे संकेत मिळत आहेत.

पाटील यांनी घोषणा केलेले “मिशन 220′ त्याचाच एक भाग मानायला हरकत नाही. हे मिशन यशस्वी झाले तर पाटील यांची प्रतिमा उजळून निघेल. महाराष्ट्रासाठी ते अमित शहा ठरतील. गेल्यावेळी विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढताना भाजप आणि शिवसेना यांनी 200 चा आकडा पार केला नव्हता. दोघांचा एकत्रित आकडा 180 च्या आसपास होता. आता एकत्र लढताना हा आकडा 220 पर्यंत वाढवण्याचा पल्ला ते गाठू शकतात; पण विरोधी पक्ष राज्यात युतीला कसे आणि किती आव्हान उभे करतात यावरच चंद्रकांत पाटील यांच्या “मिशन 220′ चे भवितव्य अवलंबून आहे, हे विसरून चालणार नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)