विद्यार्थी, चाकरमानी त्रस्त : भाजप आघाडी आंदोलन छेडणार
शिरूर – शिरूर- लोणी मार्गावरील एसटीला नेहमीच उशिरा होत आहे. त्यामुळे विद्यार्थी व नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोज त्रास सहन करावा लागत आहे. एसटी महामंडळाला प्रवाशांनी वारंवार तक्रारी करूनही अधिकाऱ्यांवर काडीमात्र परिणाम झाला नाही. त्यामुळे प्रवाशांतून संताप व्यक्त होत आहे.
शिरूर आगारात एसटीचे वेळापत्रक चुकत असल्यामुळे शिरूर भारतीय जनता पार्टीच्या विद्यार्थी आघाडीच्या वतीने आज शिरूर बसस्थानकाचे आगारप्रमुख यांना निवेदन देण्यात आले. एसटीचे सोडण्याच्या वेळेचे नियोजन करा; अन्यथा एसटी आगाराविरोधात आंदोलन करावे लागेल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. शिरूर- लोणी मार्गावर धावणारी एसटी बस रोज सायंकाळी सव्वाचार वाजता सुटण्याची वेळ आहे. परंतु ही एसटी कायम वेळेवर लागत नाही. बसला तास-दोन तास उशीर होत आहे. यामुळे शिरुर एसटी आगाराचा भोंगळ कारभार समोर आला आहे.
ही एसटी वेळेवर न लागल्याने अण्णापूर, कवठे येमाई, सविंदणे, लोणी गावांतील विद्यार्थी व नागरिक, शेतकऱ्यांचे हाल होत आहे. शिरूर शहरात शिक्षण आणि नोकरीसाठी येणाऱ्या विद्यार्थी, चाकरमान्यांची संख्या लक्षणीय आहे. त्याचा फटका त्यांना सोसावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांतून संताप व्यक्त होत आहे. शिरूर लोणी एसटी बस दररोज वेळेत लागावी. यातून विद्यार्थी नागरिक शेतकऱ्यांची सुटका व्हावी, अशी मागणी भाजपा विद्यार्थी आघाडी यांच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष ओंकार ससाने विजय नरके, हुसेन शहा, सौरभ पडवळ, सागर रोकडे उपस्थित होते.