पुणे – अल्पसंख्याक समाजातील उच्च व्यावसासिक शिक्षण घेणाऱ्या व इयत्ता बारावीनंतरच सर्व अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना तांत्रिक कारणामुळे शिष्यवृत्तीच वाटप होऊ शकली नाही. त्यामुळे या शिष्यवृत्तीचा 70 कोटी रुपयांचा निधी सन 2019-20 च्या शैक्षणिक वर्षात उपलब्ध करून त्यातून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची थकीत रक्कमही वाटप करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
अर्थिकदृष्ट्या कमकुवत व गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी सन 2011 च्या शासन निर्णयाद्वारे शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. सन 2018-19 या वर्षासाठी 73 कोटी 25 लाख रुपयांचा निधी शिष्यवृत्ती वाटपासाठी शासनाच्या अल्पसंख्याक विभागाकडून उपलब्ध करुन देण्यात आला होता. मात्र, काही अडचणींमुळे यातील केवळ 5 कोटी 65 लाख 69 हजार रुपये एवढाचा निधी विद्यार्थ्यांना वाटप करता आला. उर्वरित निधी मात्र वितरितच करता आला नाही. यामुळे विद्यार्थ्यांकडून अनेकदा नाराजी व्यक्त करण्यात आली होती. शिष्यवृत्ती न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला. शिष्यवृत्तीची प्रलंबित रक्कम शासनाने उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती. प्रलंबित निधी आता येत्या शैक्षणिक वर्षात उपलब्ध करुन देण्याची विनंती तंत्र शिक्षण संचालनालयाच्या संचालकांनी एप्रिल 2019 मध्ये केली होती. शासनाकडून त्याची दखल घेण्यात आली व निधी उपलब्ध करुन देण्यास मंजुरीही दिली आहे.
शिष्यवृत्ती योजनेसाठी एकूण 120 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर असून त्यातील 40 कोटी रुपये एप्रिल ते जुलै या कालावधीच्या खर्चासाठी उपलब्ध होणार आहे. उर्वरित निधी पावसाळी अधिवेशनात मान्य झाल्यानंतर वाटप करण्यात येणार आहे. शासनाकडून संबंधित विभागाला निधी वितरित केल्यानंतर शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना त्याचे त्वरीत वाटप करण्याचे आदेशही शासनाच्या अल्पसंख्याक विभागाचे सहसचिव सं. छ. तडवी यांच्याकडून अधिकाऱ्यांना बजाविण्यात आले आहेत.