सासवड – कोडीत (ता. पुरंदर) येथे 13 वर्षांच्या शाळकरी मुलीवर 55 वर्षांच्या नराधमाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. सासवड पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव राजू बाजीराव बडदे (वय 55, रा. कोडीत, ता. पुरंदर) आहे. सासवड पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार कोडीत येथे धनगर समाजाचे कुटूंब मेंढ्या चारण्यासाठी पाल टाकून उतरले होते. सोमवारी (दि. 10) सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास मेंढपाळ कुटुंबातील पीडित मुलगी पालाबाहेर खेळत होती. त्याचवेळी आरोपी राजू बडदे हा तेथे दुचाकीवरून आला. आरोपीचे जवळच शेतजमीन आहे. त्याने शेतातून स्प्रिंकलर मशीन आणायचे आहे. मशीन धरून बसण्यासाठी तू माझ्याबरोबर चल, असे सांगत मुलीला दुचाकीवरून शेतात घेऊन गेला.
शेतातील गोठ्याजवळ दुचाकी उभी करून पीडिताला शेजारच्या चारीत स्प्रिंकलर मशीन आहे, ती घेऊन यायला सांगितले. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार केला. त्यानंतर कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पीडित मुलीला पालाजवळच्या रस्त्यावर सोडून दिले. यामुळे घाबरलेल्या मुलीने बहीण व आईला घडलेला प्रकार सांगितला. मुलीचे वडील बाहेरगावी गेले असल्याने घाबरून त्यांनी कोणाकडे याची वाच्यता केली नाही. गुरुवारी सायंकाळी वडील घरी आल्यानंतर त्यांना झालेला प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.