विरोधकांच्या बालेकिल्ल्यातच कोट्यवधीची कामे

आ. शंभूराज देसाई यांचे चिटेघर येथील कार्यक्रमात प्रतिपादन

सणबूर – पाटण मतदारसंघातील जनतेने मोठ्या विश्वासाने आपल्या ताब्यात मतदारसंघाची आमदारकी दिली. त्याच विश्वासाने मतदार संघातील विकासाची कामे मार्गी लावण्याचे काम आपण गेल्या चार वर्षात केले आहे. हा भाग माजी आमदारांचा बालेकिल्ला समजला जातो. विरोधकांच्या याच बालेकिल्ल्यात आपण साडेचार वर्षात कोट्यावधींची विकासकामे मंजूर करुन दिली असल्याचा दावा करुन विरोधकांनी यापूर्वी विकासनिधी न देता केवळ टिकाटिप्पणीच करण्याचे काम केले आहे. त्याकडे दुर्लक्ष करत कार्यकर्त्यांनी माणसाला माणूस जोडावा, असे जाहीर आवाहन आमदार शंभूराज देसाई यांनी केले.

चिटेघर, ता. पाटण येथे आ. शंभूराज देसाई यांच्या डोंगरी विकास निधीमधून मंजूर झालेल्या सभामंडप कामांच्या भुमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, मुक्ताबाई माळी, शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, सुरेश जाधव, संजय पुजारी, सिताबाई भोसले, सखाराम शिंदे, तुकाराम भोसले, बापूराव सावंत, हणमंत शिंदे, बाळासो जाधव, कोंडिबा साळुंखे उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आ. देसाई म्हणाले, पाटण मतदार संघातील गावांसह वस्त्यांचा विकास व्हावा, हे मतदारसंघाचा प्रथम नागरिक म्हणून आपले ध्येय आहे. सातारा जिल्ह्यात सर्वाधिक मते देऊन मतदार संघातील जनतेने आपणांस निवडून दिले. जनतेच्या विश्वासाला कुठेही तडा न जावू देता साडेचार वर्षात जिल्ह्यात सर्वाधिक निधी पाटण मतदारसंघात मंजूर करुन आणला आहे. पाटण जिल्हा परिषद मतदारसंघ हा माजी आमदारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदार संघाने माजी आमदारांना प्रत्येक निवडणुकीत भरभरुन मते दिली.

परंतु माजी आमदारांनी त्या मानाने या विभागाचा विकास केला नाही. विकास झाला तर या विभागातील जनता सुज्ञ होईल आणि हे आपल्याला घातक आहे. या दृष्टीकोनातून त्यांनी या विभागाला विकासापासून कोसोमैल दूरच ठेवण्याचे काम केले. परंतु गत दोन निवडणुकीत जनतेने चांगला उठाव केला. विकास करणाऱ्या नेतृत्वाच्यामागे ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे प्रत्येक गावामध्ये मोठ्या प्रमाणात विकासाचे पर्व सुरु झाले आहे.

विरोधकांच्या बालेकिल्ल्यात आपण साडेचार वर्षात कोट्यावधींची विकासकामे मंजूर करुन दिली आहेत. पण काम करायला आपण आणि मत मागायला विरोधक असे होता कामा नये याची काळजी जनतेने घ्यावी. चिटेघर गावास विकासाच्या बाबतीत झुकते माप देण्याचा मी प्रयत्न करीन असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)