मागासवर्गीय सहकारी औद्योगिक संस्थेत कोट्यवधीचा घोटाळा 

बोगस सभासदांची नोंदणी : उच्च न्यायालयात जनहित याचिका

मुंबई – मागासवर्गीय सभासदांची बोगस नोंदणी करून कोट्यवधीचा घोटाळा करणाऱ्या राज्यातील 82 मागासवर्गीय सहकारी औद्योगिक संस्थांविरोधात कारवाई करून नोंदणी रद्द करा.तसेच राज्य सरकारने देऊ केलेले अनुदान रोखा, अशी विनंती करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

इचलकरंजी येथील सामाजिक कार्यकर्ते विजय सनदी यांच्यासह काही व्यक्तींच्या वतीने ऍड. धैर्यशील सुतार यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होण्याची शक्‍यता आहे.

राज्य शासनाने मागासवर्गीय समाजासाठी खास करून अनुसूचित जातीसाठी औद्योगिक सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी प्रोत्साहनपर योजना जाहीर केली. त्यामध्ये साखर उद्योग, गारमेंट उद्योग, यंत्रमाग, कापूस प्रक्रिया, कपडा प्रक्रिया तसेच खांडसरी साखर औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांचा समावेश करण्यात आला.

या संस्थांमध्ये प्रामुख्याने 70% सभासद हे अनुसूचित जातीचे असणे बंधनकारक केले. या संस्थांना 5 टक्के सभासद भागभांडवल, 35% शासकीय भागभांडवल अनुदान रक्कम तसेच 35% रक्कम ही दिर्घकालीन कर्ज व उर्वरित 25 % रक्कम खासगी अर्थ संस्थेकडून दिले जाणार होते. त्यानुसार राज्यात सुमारे 372 संस्था स्थापन झाल्या. त्यांना अर्थसहाय्य मंजूर केले गेले व पहिला हप्ता सुद्धा वितरीत केला गेला. परंतु त्यापैकी बऱ्याच संस्थांमध्ये मागासवर्गीय बोगस सभासदांची नावे घालून राज्य सरकारची दिशाभूल करत कोट्यवधी रुपयाचे अर्थसाह्य लाटले. परंतु प्रत्यक्षात कोणताही उद्योग सुरु केला गेलाच नाही.

सर्व कागदोपत्री संस्था दाखवून अर्थसहाय्य उचलणे हाच मूळ हेतू होता, असा दावा याचिकेत केला. तसेच विधिमंडळाच्या लोखलेखा समितीने या सर्व प्रकरणामध्ये गंभीर दाखल घेऊन चौकशी केली. त्यामध्ये बऱ्याच संस्थांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचेही उघडकीस आले. त्यामध्ये 40 मागासवर्गीय सह. औद्योगिक संस्थांविरोधात फौजदारी कारवाई तसेच 24 संस्थांविरोधात प्रशासकीय कारवाई करण्याचा आदेश दिला गेला. त्यापैकी काही संस्थांवर फौजदारी झाली. परंतू काही संस्था आजही कारवाईपासून नामानिराळ्या आहेत, असा आरोपही याचिकेत करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)