दुग्धवर्धक पदार्थ (गॅलॅक्टोगॉग्ज) (भाग १)

बाळाची वाढ आणि विकास यामध्ये स्तनपानाचा मोलाचा वाटा असतो. आई जरी बाळाच्या जन्मानंतर लगेच स्तनपान सुरू करत असली तरी त्यात तरबेज होण्यासाठी थोडा काळ जावा लागतो, थोडा धीर ठेवावा लागतो. यादरम्यान बाळाला दूध पुरतेय का? बाळ अजून भुकेलेच नाही ना? भुकेमुळे बाळ किरकिर करतंय का? बाळाला पुरेल इतकं दूध मला येतंय ना? इ. इ. अशी काळजी स्वाभाविक असते आणि पहिलटकरिणींमध्ये ती जास्त प्रमाणात दिसून येते. नवीन बाळ, नवीन आई म्हटलं की अनेक सल्लेदेखील मिळतात. 
डॉ. मानसी पाटील 
मला दुग्धवर्धक पदार्थांची आवश्‍यकता आहे का?
दुग्धवर्धक पदार्थ आईचे दूध वाढविण्यास मदत करतात. जरी सगळ्या आया दुधाच्या प्रमाणाबद्दल चिंता करत असल्या तरी बहुतांश आयांना पुरेशा प्रमाणात दूध येते. अशा आयांना दुग्धजन्य पदार्थांची तशी गरज नसते. जय बाळाची स्तनाची पकड व्यवस्थित असेल आणि जर 2-3 तासांनी तुम्ही बाळाला दूध पाजू शकत असाल तर तुम्हाला पुरेसे दूध येते असे समजायला हरकत नाही. दूध पुरेसे असण्याचे दुसरे चिन्ह म्हणजे बाळाने दिवसातून 6 ते 8 वेळा शू करणे. काही क्वचित वेळा काही आयांना दुग्धवर्धक पदार्थ देण्याची गरज भासते. भारतात पूर्वापारपासून स्तनपान करणाऱ्या मातांच्या आहारात अनेक दुग्धवर्धक पदार्थांची रेलचेल असते. याचे प्रमाण आता हळू-हळू कमी होऊ लागले आहे.
दुग्धवर्धक पदार्थांची गरज केव्हा भासू शकते?
अंगावर दूध न येणे किंवा त्याचे प्रमाण कमी असणे बऱ्याचदा त्रासदायक ठरते पण त्यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात. दुग्धवर्धक पदार्थ खालील कारणांमध्ये उपयुक्त ठरू शकतात…
जेव्हा अंगावरच्या दुधाचे प्रमाण कमी असते आणि याचे कोणतेही कारण सापडत नाही.
तुम्ही बाळासाठी पंपने दूध काढता.
अपुऱ्या दिवसांचे अथवा वजनाचे बाळ झाल्यास, ते दवाखान्यात असल्यास पंपने दूध काढायची वेळ येते.
स्तनांची शस्त्रक्रिया झाल्यानंतर स्तनपान करायची वेळ येते.
पाळी पुन्हा सुरू होण्यामुळे अथवा काही प्रकारच्या गर्भनिरोधक गोळ्यांमुळे अंगावरील दूधाचे प्रमाण कमी होते.
दत्तक घेतलेल्या बाळाला स्तनपान करण्याची तुमची इच्छा असते.
स्तनपान बंद केले असताना तुम्हाला ते पुन्हा सुरू करावेसे वाटते.
अंगावरील दुधाचे प्रमाण कसे वाढवता येईल? 
बाळाच्या चोखण्यामुळे अथवा ब्रेस्ट पंपच्या सहाय्याने पंप केल्यानंतर अंगावरचे दूध स्त्रवायला सुरुवात होते. त्यामुळे नैसर्गिकरित्या अंगावरच्या दूधाचे प्रमाण वाढविण्यासाठी खालील गोष्टी करता येतील:
बाळाने स्तनाग्र ओठांमध्ये नीट पकडले आहे याची खात्री करा. ही पकड योग्य असल्यासच दूध नीट स्त्रवते. याबाबत तुम्हाला खात्री नसेल तर तज्ञांचा सल्ला घ्या.
स्तनांना नियमितपणे उत्तेजन द्या. नियमित स्तनपान करून अथवा पंपने दूध काढून दूधाचे प्रमाण वाढेल. दोन स्तनपानांमध्ये पंपच्या सहाय्याने दूध काढल्याचाही फायदा होईल. फक्‍त पंपचा वापर करत असल्यास दर 2 ते 3 तासांनी पंप वापरून दूध काढणे फायदेशीर ठरेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)