दूध संघ दरवाढ करण्याच्या तयारीत

पुणे – दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर 25 रुपये भाव देण्यासाठी पाच रुपयांचे अनुदान स्विकारल्यानंतर आता दूध संघांनी ग्राहकांच्या खिशाला ताण देण्यास सुरुवात केली आहे. गोकूळने दरात दोन रुपयांनी वाढ केल्यानंतर आता इतरही संघ दरवाढ करण्याच्या तयारीत आहेत.

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर 25 रुपये भाव द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले होते. त्यानंतर राज्य शासनाने खासगी व सहकारी दूध संघांना पाच रुपये अनुदान जाहीर करून शेतकऱ्यांना 25 रुपये प्रतिलिटर दर देण्याचे आदेश दिले. त्यावेळी दूध संघांनी पिशवीतील दुधाच्या दरात कुठलीही वाढ केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते; पण शेतकऱ्यांना 25 रुपये देण्यास सुरुवात केल्याबरोबर दूध संघांनी पिशवीतील दुधाच्या दरात वाढ करण्यास सुरवात केली आहे. प्रत्यक्षात पाच रुपये अनुदान शासनाकडून मिळणार असल्याने दूध दरात वाढ करणे योग्य नसल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. एकीकडे अनुदानही घ्यायचे आणि ग्राहकांकडूनही जादा पैसे उकळायचे. यामुळे ग्राहकांच्या खिशाला चाट पडणार आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)