“मिग-29′ विमानाच्या क्षमतेत वाढ 

दोन स्क्वॉड्रन अदमपूर विमानतळावर तैनात 
जालंधर: भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील “मिग-29′ विमानाच्या क्षमतेत वाढ करण्यात आली आहे. या अपग्रेडशनमुळे त्यांचा वेग आणि मारक क्षमता वाढवली आहे. लढाऊ विमानांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने भारतीय हवाई दलाने मिग विमानांना अधिक शक्तिशाली आणि संहारक बनवले आहे.
रशियन बनावटीची मिग विमाने आता हवेतच इंधन भरू शकतात. तसेच या विमानातून एकावेळी अनेक दिशांना मारा करता येऊ शकणार आहे. ही विमाने चीन आणि पाकिस्तानवर नजर ठेवण्यासाठीही महत्त्वाची आहेत, अशी माहिती हवाई दलाच्या अदमपूर विमानतळावर तैनात असलेल्या फ्लाइट लेफ्टनंट करण कोहली यांनी दिली.
आधीच्या व्हर्जनमधील मिग विमानांनीही महत्त्वाचे योगदान दिले होते. 1999च्या कारगिल लढाई दरम्यान “मिग-29′ विमानांनी पाक सैन्याला पराभूत करण्यात मोठी कामगिरी बजावली होती. गेल्या आठवड्यात हवाई दलाच्या अदमपूर विमानतळावर अपग्रेड केलेल्या “मिग-29′ विमानांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. हवाई दलाच्या उद्या होणाऱ्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात ही विमाने आपली प्रात्यक्षिके सादर करणार आहेत. या “मिग-29′ विमानांमध्ये मल्टि-फंक्‍शनल डिस्प्लेही लावण्यात आला आहे.
हवाई दलाचे अदमपूर विमानतळ हे पाकिस्तानपासून 100 किमी आणि चीनपासून 250 किमी अंतरावर आहे. यामुळे सामरिक दृष्ट्‌या महत्त्वाच्या असलेल्या या अदमपूर विमानतळावर अपग्रेड केलेली “मिग-29′ विमाने तैनात करण्यात आली आहेत. हवाई दलातील “मिग-29′ विमानांची तीन स्क्वॉड्रन सध्या कार्यरत आहेत. या पैकी दोन स्क्वॉड्रन अदमपूर विमानतळावर तैनात आहेत. एका स्क्वॉड्रनमध्ये किमान 16-18 विमाने असतात. भारताच्या हवाई हद्दीत घुसखोरीची कुठलीही माहिती मिळताच “मिग-29′ हे विमान केवळ 5 मिनिटांत उड्डाण करू शकते, अशी माहिती कोहली यांनी दिली.
अपग्रेड केलेल्या “मिग-29′ विमानांची मारक क्षमता आता उत्तम झाली आहे. या विमानांद्वारे आपण हवेतू-हवेत, हवेतून-जमिनीवर आणि समुद्रातील जहाजांविरोधातही कारवाई करू शकतो. “मिग-29’च्या अपग्रेड व्हर्जनमध्ये सर्व अत्याधुनिक फिचर्स आहेत, अशी माहिती एका पायलटने दिली.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)