“एमआयडीसी’त बगलबच्च्यांकडून खंडणीचे उद्योग

नगरसेविका सिध्दी पवार यांचा आरोप; उद्योजक त्रस्त, प्रसंगी खासदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करू

सातारा- खासदार उदयनराजे भोसले यांच्या बगलबच्च्यांनी त्यांच्या नावाखाली खंडणीचे उद्योग सुरू ठेवल्याने सातारा एमआयडीसीचे उद्योजक त्रस्त आहेत. रवी साळुंखे हे माझे कार्यकर्ते नाहीत हे उदयनराजे यांनी सादर करावे अन्यथा राजेंच्या विरोधात पुरावे गोळा करून गुन्हा दाखल करण्यात येईल.

खंडणी प्रकरणात न्याय न मिळाल्यास मंत्रालयात आत्मदहन करण्याचा इशारा भाजपच्या नगरसेविका सिध्दी पवार यांनी पत्रकार परिषदेत दिला.

मंत्रालयात आत्मदहन करण्याचा इशारा
उदयनराजे यांचे समर्थक रवी साळुंखे व सिध्दी पवार यांच्यात गाळ्याच्या भाडेप्रकरणावरून खंडणीचे आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. सिद्धी पवार यांनी माझी पंधरा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप रवी साळुंखे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. त्याचा खुलासा करणारी पत्रकार परिषद सिध्दी पवार यांनी घेऊन साळुंखे यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात जबरदस्तीने खंडणी वसुली करण्याचा प्रयत्न करणे व विनयभंग असे गुन्हे दाखल करण्यात आल्याचे पत्रकारांना सांगितले. सिद्धी पवार पुढे म्हणाल्या, “”मी एक सामान्य सातारकर असून एक उद्योजिका या नात्याने सातारा एमआयडीसीत छोटासा उद्योग चालविते.

मात्र, खासदार उदयनराजे भोसले यांचे कार्यकर्ते रवी साळुंखे यांनी मला तीन लाख रुपयांची खंडणी मागितली. मला जीवे मारण्याची धमकी देऊन अश्‍लील भाषेत शिविगाळ केली. उदयनराजे यांची चाटूगिरी करून एमआयडीसीत हप्तेबाजी करणाऱ्यांची मालमत्ता पाच कोटी कशी? मी उदयनराजेंची कधी हुजरेगिरी करून कोणाच्या जमिनी बळकावलेल्या नाहीत. मात्र, उदयनराजे कार्यकर्त्यांना पाठीशी घालून सारे ऑलवेल असल्याचे दाखवतात.

साळुंखे माझा समर्थक नाही हे उदयनराजेंनी जाहीर करावे, अन्यथा त्यांच्याही विरोधात पुरावे गोळा करून खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात येईल.” ईव्हीएम मशीनमुळे नव्हे तर एमआयडीसीत खंडणी मागणाऱ्या बगलबच्च्यांमुळे उदयनराजे यांचे मताधिक्‍क्‍य घटल्याचे सांगून सिध्दी पवार म्हणाल्या, “” साळुंखे यांच्या कारनाम्यांची कल्पना मी अनेक वेळा उदयनराजे यांना देण्याचा प्रयत्न केला. मात्र, आम्ही विरोधक म्हणून उदयनराजे आमचा फोन स्वीकारत नाही. त्यांच्या आजूबाजूला इतके बगलबच्चे असतात की त्यांचा नक्की पीए कोण, कोणाकडे तक्रार करायची हेच समजत नाही.” मी नेत्याच्या नावावर कधी खंडणी गोळा करत नाही, मात्र कोणी माझ्या पोटावर पाय आणण्याचा प्रयत्न केल्यास त्याला सोडणार नाही, असा इशारा पवार यांनी दिला.

“मी कोणाची फसवणूक केली ते आरोप करणाऱ्यांनी शाबित करावे, मी राजकारण सोडेन, आम्ही विरोधात बोलतो म्हणून षड्‌यंत्र रचून मला अडचणीत आणण्याचे हे प्रकार आहेत. पण अशा प्रकरणात मी डगमगणारी स्त्री नाही. सुरुवातीला साळुंखे यांनी माफी मागितल्याने मी विषय वाढवला नाही पण गाळ्याची मालकी दाखवून पंधरा लाखाची फसवणूक केल्याचा आरोप धादांत खोटा आहे. भाडे चार वर्ष व्यवस्थित मिळत होते तेव्हा अडचण आली नाही मग आत्ताच मी फसवणूक केल्याचा आरोप कसा होऊ शकतो,” असा प्ररश्‍न त्यांनी केला.

साळुंखे यांनी माझा प्रॉफिट बघून मला तीन लाख रुपयांची खंडणी मागितली. त्याला नकार दिल्यावर त्यांनी असभ्य भाषेत शिविगाळ केल्याचा आरोप त्यांनी केला. खादी घालून खंडणी मागणाऱ्या पांढऱ्या बगळ्यांना शासन झाले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here