मायक्रो स्क्रीन्स : स्कूल बॅग   

प्राजक्‍ता कुंभार 

16 डिसेंबर 2014 च्या एका घटनेनं अवघ्या जगाचं लक्ष पाकिस्तानवर केंद्रित केलं होतं, ती घटना होती पेशावरच्या आर्मी पब्लिक स्कूलवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याची! तालिबानी दहशदवाद्यांच्या या हल्ल्यात 132 चिमुकल्यांचे जीव गेले. दहशतवादाला सतत पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानातच झालेल्या या हल्ल्यानं, दहशतवादी हे कोणाचेच सगेसोयरे नसतात हे दाखवून दिलं.

-Ads-

आंतरराष्ट्रीय राजकारण, सीमाप्रश्‍न यांच्याशी काहीही संबंध नसणारी 132 निरागस आयुष्यं यात विनाकारण बळी जाणं, ही फार मोठी किंमत म्हणावी लागेल. काय विचार करून आले असतील हे 132 चेहरे त्यादिवशी शाळेत..? मित्रांना भेटू, मजा करू, सोबत डबा खाऊ, आवडत्या शिक्षकांशी गप्पा मारू आणि काय काय… कोणाचा वाढदिवस असेल किंवा एखादं पिल्लू, सकाळी सकाळी ‘नाही ना जायचं आज शाळेत’ म्हणून आई बाबांकडे अगदी भोकाड पसरून रडलंही असेल. पण ‘हा माझा शाळेचा शेवटचा दिवस..’ हे असलं काही अगदी चुकूनही डोक्‍यात आलं नसेल यापैकी एकाच्याही. याच सत्यघटनेवर आधारित आहे ‘स्कूल बॅग’ ही धीरज जिंदाल या दिग्दर्शकाची 15 मिनिटांची गोष्ट. दहशतवादचा कोणताही उघड संदर्भ न घेता, आई-मुलाच्या नात्यातून हा प्रवास उलगडत जातो.

गोष्ट सुरु होते, ती फारुखच्या (सरताज कक्‍कर) दार ठोठावण्यानं. त्याची आई (रसिका दुग्गल) त्याला घरातून आवाज देऊन ‘आलेच रे’ सांगते, तरी त्याकडे दुर्लक्ष करून त्याचं कडी वाजवणं आणि आईला आवाज देणं सुरूच आहे. खरंतर त्याला आईशी बोलायचं, त्याने शाळेत काय झालं, मित्राच्या वाढदिवसाला त्याच्या घरी जाऊन काय खाल्लं, काय काय मजा केली, हे सगळं त्याला आईशी बोलायचं. दारातून पाऊल आत ठेवल्यापासून, त्याची आईभोवती ही बडबड सुरू होते. हे त्या दोघांचं विश्‍व आहे. तो आणि त्याची आई. बास बाकी कोणाची गरज नाहीये त्याला.

उद्या त्याचा ‘सातवा’ वाढदिवस आहे, म्हणून मग त्याने आजच आईकडे त्याला अतिशय आवडणाऱ्या ‘सेवय्या’ बनवण्याची फर्माईश केली. आईसोबतच्या या सगळ्या गप्पा सुरू असताना, फारूखला अचानक एका महत्त्वाची गोष्ट आठवते… ‘बर्थडे गिफ्ट’. त्याला एका नवी कोरी ‘स्कूल बॅग’ हवीये. तो आईला सांगतो, अगदी हट्टच करतो तिच्याकडे. पण त्याची अम्मी त्याला हो किंवा नाही असं काहीच उत्तर देत नाही. रात्रीही तो अम्मीला आठवण करून देतो, ‘चल ना जाऊ.. आता तर दुकानं पण बंद होतील.. मला हवीये ती स्कूल बॅग..’ पण तरीही त्याची अम्मी जाणूनबुजून त्याकडे दुर्लक्ष करते. शेवटी ‘मला जर उद्या नवी स्कूल बॅग दिली नाही तर मी शाळेत जाणार नाही’ असं सांगून अगदी हिरमुसला होऊन फारूक झोपी जातो. दुसऱ्या दिवशी उठल्यावर आईशी एकही शब्द न बोलता, फारूख आपल्या खोलीत येतो, तर त्याच्या बिछान्यावर असते, तीच त्याला हवी असणारी स्कूल बॅग. ती बॅग घेऊन तो बागडतच शाळेत जातो आणि अम्मी त्याला आवडणाऱ्या ‘सेवय्या’ बनवायला सुरुवात करते. रेडिओवर सुरू असणारी गाणी गुणगुणत, फारूखचा आनंदी चेहरा आठवत, आता तो शाळेत कोणाकोणाला त्याची नवी बॅग दाखवत असेल, त्याची कल्पना करत आणि ती बातमी रेडिओवर येते.. आर्मी पब्लिक स्कूलवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याची.

रसिका दुग्गल आणि सरताज कक्‍कर हे दोघेही अगदी रमल्यासारखे वाटतात त्यांच्या भूमिकेत. आईच्या चेहऱ्यावर असणारं उबदार हसू रसिका यांच्या अभिनयाला ‘चार चांद’ लावतं, आणि सरताज, त्याच्यावरून तर एकाही फ्रेममध्ये लक्ष हटत नाही. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारांची मानकरी ठरलेली ही गोष्ट जरूर एकदा अनुभवायला हवी अशीच.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)