मायक्रो स्क्रीन्स : रोगन जोश 

प्राजक्‍ता कुंभार 

रात्रीचं एकत्र जेवण आणि जेवणाच्या टेबलावर रंगणाऱ्या गप्पा. विषयांचं बंधन नसणाऱ्या, अनेकदा सहज संवादातून गुपितं उलगडणाऱ्या आणि खेळीमेळीच्या वातावरणात, आयुष्य नव्याने जगायला उर्मी देऊन जाणाऱ्या. खरंतर या जेवणाच्या टेबलावरच्या गप्पांची अनेक चित्रपटांच्या कथानकांना भुरळ पडली. डायनिंग टेबलावर होणारे संवाद हे अनेक चित्रपटांना स्वतःची वेगळी अशी ओळखही देऊन गेले. पण शॉर्टफिल्मच संपूर्ण कथानकाचं जर जेवणाच्या टेबलाभोवती गुंतलेलं, आणि त्याच टेबलाभोवती उलगडणारं असेल तर? आणि हा प्रवास ‘रोगन जोश ‘ या मुघलांनी भारतात आणलेल्या एका उत्तम काश्‍मिरी पदार्थासोबत रंगणार असेल तर? रोगन जोश ही संजीव वीग या दिग्दर्शकाची 15 मिनिटांची सस्पेन्स थ्रिलर गोष्ट. पण या गोष्टीचा सस्पेन्सही रात्री एकत्र जेवताना होणाऱ्या गप्पांतून उलगडतो आणि शेवटच्या फ्रेममध्ये दिसणारी तारीख पाहून आपल्यालाही क्षणभर ब्लॅंक झाल्यासारखं वाटतं.

गोष्ट सुरू होते ती विजय (नसरुद्दीन शाह) यांच्या स्वयंपाकघरात. टेबलवर मांडून ठेवलेल्या प्लेट्‌स, वाईनचा ग्लास, भिंतीवर डकवलेलं जुनं व्हिक्‍टोरियन घड्याळ! हे नजरेत साठवत असतानाच स्वयंपाकघरातून ऐकू येते, कुकरची शिट्टी. काय असतं आज? “ताज’मध्ये हेड शेफ असलेल्या विजयचा आज वाढदिवस आहे. त्यासाठी त्याने ‘रोगन जोश’ ही त्याची खासियत असणारी डिश बनवलीये. एकीकडे बायकोशी गप्पा मारत असताना, दुसरीकडे वेगवेगळे पदार्थ बाहेर टेबलवर मांडून ठेवणंही सुरू आहे त्याचं. त्याचवेळी मुलाला जेवायला यायला उशीर होणारे हा निरोप त्याची बायको त्याला देते आणि तो अस्वस्थ होतो. ‘ज्यावेळी उशीर करायचा नेमकं, त्याच वेळी हा का लवकर आला होता?’ असा प्रश्‍न तो वैतागून बायकोला विचारतो खरा, पण या प्रश्‍नाचा संदर्भ या शॉर्टफिल्मच्या शेवटाकडे लक्षात येतो आपल्या.

मग सुरू होतात जेवणाच्या टेबलावरच्या गप्पा. वेगवेगळे विषय, मुलाच्या लग्नाचे, नातवंडांचे वेगवेगळे संदर्भ येत राहतात. हा आपल्याच घरातला प्रसंग असावा अगदी इतपत आपणही त्या गप्पांमध्ये गुंतून जातो. गप्पा रंगतात आणि नेमकं त्याच वेळी घराचं दार उघडतं. एक स्त्री, तिच्यासोबत एक लहान मुलगा आणि एक पुरुष घरात प्रवेश करतात. गप्पांच्या संदर्भातून ते विजयचे सून आणि नातू आहेत, हे लक्षात येतं. पण मग ते एकमेकांशी बोलत का नाहीत? किंवा जेवणाच्या टेबलवर कोणीच नसल्यासारखे सरळ दुर्लक्ष कसे करतात? या सगळ्या प्रश्‍नांची उत्तरं उलगडतात शेवटच्या फ्रेममधून, ज्यात फक्त एक तारीख दिसते- 26/11.

26/11 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात अनेकांनी आपल्या जवळच्या लोकांनां गमवलं. आपण आपल्या माणसांना अगदी शेवटचं बघतोय अशी पुसटशीही कल्पना नसणाऱ्या अनेकांची कुटुंब उद्‌ध्वस्त झाली. पण ‘रोगन जोश’ची कथा हा प्रवास खूपच वेगळ्या पद्धतीने उलगडते आपल्यासमोर. ही गोष्ट बघताना दचकायला होतं, डोकं सुन्न होतं आणि गोष्ट संपल्यावरही ते कथानक फिरत राहतं आपल्या डोक्‍यात. असं म्हणतात की ‘रोगन जोश’ या पदार्थाचं वैशिष्ट्य्‌ त्याला उत्तम शिजवण्यावर अवलंबून असतं. अगदी मिनिटभरही हा पदार्थ जास्त शिजला की त्याची चव बिघडते. म्हणूनच अभिनय, कथा, संवाद अशा सगळ्याच पातळ्यांवर उत्तम जमलेला हा ‘रोगन जोश ‘ एकदा अनुभवायला हवा.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)