मायक्रो स्क्रीन्स : आऊच… 

प्राजक्‍ता कुंभार 

मिडलाइफ क्रायसिस, एक्‍सट्रा मॅरिटीयल अफेअर, या गोष्टी आजही सहज दुर्लक्षित केल्या जातात. तसंही वयाच्या 35-40 नंतरची सहवासाची गरज, त्याला असणारी शारीरिक आकर्षणाची जोड असे विषय नजरेआड ठेवण्याचा प्रयत्न असतो आपला. मिडलाइफ क्रायसिस ही खरंतर प्रत्येकाच्या आयुष्यात येणारी; अनेकांना ठेचकळवणारी जरा अफलातून फेज आहे. ज्या संसारात गेली अनेक वर्ष रमलोय, ज्या पार्टनरसोबत आयुष्याची इतकी वर्षं एकत्र घालवलीयेत, या सगळ्यातून बाहेर पडून काहीतरी नवं शोधण्याची, नव्याने कुठेतरी गुंतण्याची, प्रेम शोधण्याची गोष्ट म्हणजेच ही फेज. हीच मजेशीर गोष्ट जर “ब्लॅक कॉमेडी’च्या स्वरूपात सादर झाली तर, आणि तेही एका नावाजलेल्या दिग्दर्शकाच्या नजरेतून? “अ वेन्सडे’, “बेबी’, “स्पेशल 26′ सारखे वेगळे चित्रपट देणाऱ्या नीरज पांडे यांची ‘आऊच’ ही 15 मिनिटांची गोष्ट, याच मिडलाइफ क्रायसिसवर असून एक्‍सट्रा मॅरिटीयल अफेअरचा एक प्रवास आपल्यासमोर उलगडते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विनय (मनोज वाजपेयी) एका फाइव्ह स्टार हॉटेलच्या लॉबीतुन चालत असताना ही गोष्ट सुरु होते. त्याच्या एकूण देहबोलीतून काहीतरी बिनसलंय हे लक्षात येतं आपल्याला, पण त्यावेळी हेही कळतं की, हा लॉबीतून रूमकडे जाण्याचा रस्ता त्याच्या सरावाचा आहे. हॉटेलच्या रूममध्ये पोहचल्यावर, तो कोणाची तरी वाट पाहतोय हे जाणवतं. ‘मम्मीजी लरश्रश्रळपस’ ही रिंगटोन ऐकून आणि मोबाइलच्या स्क्रीनवर फ्लॅश होणारं आईचं नाव पाहून तो घाबरतो खरा; पण तरीही फोन उचलून तो तिला ‘मिटिंगमध्ये आहे, नंतर कॉल करतो’ असं सांगतो. या अतिशय बेचैन पार्श्‍वभूमीवर, रूममध्ये प्रवेश करते प्रिया (पूजा चोप्रा) ती त्याची प्रेमिका आहे! खरं तर दोघांचंही एक्‍स्ट्रा मॅरिटीयल अफेअर सुरू आहे.

विनयशी बोलताना प्रत्येक वाक्‍याची सुरुवात ‘आय लव्ह यु’ ने करणाऱ्या (असं का? शेवट पहाच) प्रियाचं लक्ष त्याच्या कपाळावर झालेल्या जखमेकडे जातं. ‘मी आपल्या दोघांबद्दल माझ्या बायकोला सगळं सांगून टाकलंय. तिला वाटतंय की, हा “मिडलाइफ क्रायसिस’ आहे माझ्या आयुष्यातला, पण माझं प्रेम आहे तुझ्यावर. मी सांगितलंय तिला, मी डिवोर्स देणारे असं. चिडली ती; फ्रायिंग पॅन फेकून मारला मला…’

विनय हे बोलून मोकळा होतो आणि हळूहळू गोष्ट लक्षात येऊ लागते आपल्या. आता आपल्याला अशाच काहीशा उत्तराची, एखाद्या प्रसंगाची अपेक्षा असते प्रियाकडून. ती तिच्या नवऱ्याला कसं आणि काय सांगून आली, तिच्या नवऱ्याने काय रिऍक्‍ट केलं असेल अशी उत्सुकता वाढते. पण प्रिया या सरळसरळ जाऊ पाहणाऱ्या गोष्टीचा नूरच बदलून टाकते. तिच्या प्रत्येक वाक्‍यातून, ‘विनयचं काही खरं नाही’ हे कळायला लागतं आणि या तिरपांगाड्या प्रेमाच्या गोष्टीचा शेवट तितकाच मजेशीर होतो.

विनयच्या भूमिकेत मनोज वाजपेयीला बघणं “इज ट्रीट टु आईज.’ ‘तुम्हे रिलॅक्‍स नही होना है?’ असं प्रियाला म्हणणारा, आईचा फोन आल्यावर घाबरणारा, प्रियाचा निर्णय ऐकून सैरभैर झालेला विनय त्यांनी उत्तम साकारलाय. पूजा चोप्राची ‘प्रिया’सुद्धा भाव खाऊन जाते. न चिडता, न भांडता, किंचितही न वैतागता आपल्याला हव्या तशा गोष्टी समोरच्यांकडून करवून घेणारी प्रिया उत्तमच. या दोन्ही कलाकारांची अभिनयाची जुगलबंदी, या मजेशीर गोष्टीची मजा अधिकच वाढवते. चुकून एखाद्या दुखऱ्या जागेला धक्‍का लागला तर तोंडातून अगदी आपसूक बाहेर पडणाऱ्या ‘आऊच’ या शब्दाचा हा असा भन्नाट अर्थ जाणून घेण्यासाठी किमान एकदा तरी ही गोष्ट पाहायला हवी, हे नक्‍की.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)