#मायक्रो-स्क्रीन्स…”नयनताराज नेकलेस’ 

– प्राजक्ता कुंभार 
“नयनताराज नेकलेस’ ही गोष्ट आहे, मध्यमवर्गीय स्वप्नांची; विस्कटलेल्या महत्त्वाकांक्षांची आणि ‘कुणासारखं’ तरी होऊ पाहण्याच्या प्रवासात, क्षणभर का होईना भरकटण्याची! मूलभूत गरजांच्या पलीकडे जाऊन जगण्याची प्रत्येकाची प्रेरणा वेगळी असते. जगण्याचं कारण शोधण्याची उर्मी मिळते या प्रेरणेतून. आपल्या गरज, इच्छा, महत्त्वाकांक्षा आणि जगण्याची प्रेरणा यांचं गणित नीट जुळलं की, सकारात्मक प्रवास सुरू राहतो. पण सतत कोणाप्रमाणे तरी होऊ पाहण्याच्या या प्रवासात आपल्या अहंमन्य महत्त्वाकांक्षा या प्रेरणेपेक्षा वरचढ ठरू लागल्या तर?
नेहमीच ऑफबिट चित्रपट देणाऱ्या जयदीप सरकार या दिग्दर्शकाची ‘नयनताराज नेकलेस’ ही 20 मिनिटांची गोष्ट आहे ती, नयनतारा (कोंकणा सेन) आणि अलका (तिलोत्तमा शोम) यांच्या मैत्रीची! भिन्न कौटुंबिक आणि आर्थिक पार्श्‍वभूमी असणाऱ्या या दोघीजणी मैत्रिणी होतात. महिना अखेरीच्या चौकटीबाहेरचं वेगळं आयुष्य कधीच ना पाहिलेल्या अलकासमोर स्वतःच्या नसलेल्या श्रीमंतीचा बडेजाव मिरवणारी नयनतारा आणि “नयनतारा…आपके तो नाम में ही पोएट्री है,’ असं म्हणणारी मध्यवर्गीय अलका. स्वतःच्या नावापासून, चेहऱ्यावरचे हावभाव, वागण्या-बोलण्याची लकब या सगळ्याची दुबईवरून भारतात परत आलेल्या या नव्या मैत्रिणीशी अलका तुलना करायला सुरुवात करते. पण या भावनांच्या पलीकडे कोणत्यातरी पातळीवर त्यांचा स्नेह जुळतो. त्या एकमेकींचा सहवास एक्‍सप्लोर करायला सुरुवात करतात.
नयनताराच्या पाठिंब्याने, अलका, तिच्या अनेक सुप्त इच्छा जगायला सुरुवात करते; चौकटीत बांधलेल्या स्वतःच्या आयुष्याला नव्याने जगू पाहते. झालंच तर फेसबुकवर अकाउंट ओपन करते. फेसबुकवर अलकाला तिचा शाळेत सोबत असणारा मित्र भेटतो. अनेक दिवसांच्या चॅटिंगनंतर त्याला प्रत्यक्ष भेटायला जायचा निर्णय अलका घेते, तो नयनताराच्या पाठिंब्याने! मलेशियावरून खास तिला भेटायला येणाऱ्या या मित्राला, “माझं सगळं कसं उत्तम चाललंय’ हे दाखवण्यासाठी अलका स्वतःची मध्यमवर्गीय प्रतिमा बदलून श्रीमंतीची झूल अंगावर घेते आणि आपल्या या मैत्रिणीच्या गळ्यात नयनतारा स्वतःचा एक महागडा नेकलेस अडकवते. पुढे या नेकलेसमुळे अलकाच्या आयुष्यात नेमकी कोणती वादळं येतात, हे समजून घेण्यासाठी ही शॉर्टफिल्म बघणंच उत्तम.
नयनताराची श्रीमंती हा बडेजाव आहे हे दाखवणारं, कॉम्पॅक्‍ट बॉक्‍समधलं अगदी शेवटचं उरलेलं कॉम्पॅक्‍ट, मध्यमवर्गीय घराची पार्श्‍वभूमी दाखवण्यासाठी कुकरची शिट्टी, बेसिनमधला नळ किंवा अगदीच पंख्याच्या वाऱ्याने फडफडणारं कॅलेंडर यांसारख्या एकाही शब्दाशिवाय अधिक बोलणाऱ्या फ्रेम्स, हे या शॉर्टफिल्मच वैशिष्ट्य्‌ आहे.
अलका तिच्या मित्राला भेटते त्या प्रसंगात, त्या दोघांचे, तसे एकमेकापासून विसंगत असणारे संवाद आणि अलकाच्या चेहऱ्यावरचे हावभाव, हे या कथेला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात. अभिनय, संवाद, बॅकग्राऊंड म्युझिक या सगळ्या पातळ्यांवर उत्तम जुळून आलेली आणि अहंमन्य महत्त्वाकांक्षेचा प्रवास उलगडणारी ‘नयनताराज नेकलेस’ ही गोष्ट प्रत्येकाने किमान एकदा तरी जरूर अनुभवावी अशीच आहे.

 


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)