मायक्रो स्क्रीन्स्‌: कनिका

प्राजक्‍ता कुंभार

बऱ्याचदा ठराविक विषय एकाच साचेबद्ध पद्धतीने मांडण्याची, पाहण्याची, ऐकण्याची सवय होते आपल्याला. सामाजिक समस्या, लैंगिक अत्याचार, बाललैंगिक शोषण यासारख्या विषयांवर असणाऱ्या शॉर्टफिल्म्स, त्याच त्या ठराविक पठडीतल्या मांडणी प्रकाराने आपल्यासमोर उभ्या राहतात. मग त्यातल्या सामाजिक संदेशाची धार बोथट होत जाते आणि ‘आता यात नवीन काय?’ असा प्रश्‍न उभा ठाकतो. अशावेळी गरज असते ती त्याचा त्या विषयाच्या नव्या हाताळणीची. ‘कनिका’ ही अशीच नव्या हाताळणीची गोष्ट आहे. ‘बाललैंगिक शोषण’ या विषयाचे दाहक वास्तव केवळ सात मिनिटात मांडायचा दिग्दर्शक प्रणव भसीन यांचा प्रयत्न कौतुकास्पद आहे.

काही फिल्मस्‌ या कथेमुळे तर काही दिग्दर्शनामुळे लक्षात राहतात. काही अभिनय, संगीत, संवादामुळेही लक्षात राहतात, तर काही त्या ‘कहानी में असणाऱ्या अनोख्या ट्‌विस्टमुळे.’ ‘कनिका’ ही या ट्‌विस्ट प्रकारात मोडणारी. गोष्ट सुरू होते ती कथानिवेदकाच्या माध्यमातून. एक मुलगी (निधी बिश्‍त) गोष्ट सांगते, स्वतःची. ती तिची रोजनिशी वाचून दाखवते आपल्याला, तिच्या आठवणी सांगते. खरं तर तिची ‘लव्हस्टोरी’ उलगडते आपल्यासमोर असं वाटत राहतं आपल्याला.

मुंबई शहराच्या फ्रेम्स एका मागून एक, आपल्या नजरेसमोरून सरकत जातात आणि तिच्या गोष्टीचे संदर्भ आजूबाजूला उलगडत जातात. ती खूप वर्षांनी या शहरात परत आली. त्या जुन्या आठवणींनी तिला कातर केलंय, हे असं काही वाटायला सुरुवात झालेलीच असते आपल्याला; की गोष्ट एक अनपेक्षित वळण घेते. आतापर्यंत स्क्रीनवर दिसणारी तिची अर्धवट, पाठमोरी प्रतिमा पूर्ण दिसायला लागते आणि ‘गोडंमिट्ट’ वाटणारी ही गोष्ट क्षणभरात रूप बदलते. पुढे आतापर्यंत ऐकलेलं ‘लव्हस्टोरी’चं निवेदन हे एका दुसरी-तिसरीतल्या शाळकरी मुलीचं आहे हे समजतं आपल्याला आणि या गोष्टीला असणारी बाललैंगिक शोषणाची बाजू आपल्यासमोर उलगडते.

गिरवून पक्‍क्‍या झालेल्या एखाद्या विषयाची मांडणी नव्याने कशी करावी याच उत्तम उदाहरण म्हणजे ही ‘कनिका’ची गोष्ट. घटनेचं गांभीर्य दाखविण्यासाठी, प्रत्येकवेळी तीच ती मांडणी कशी टाळता येऊ शकते हे या शॉर्टफिल्ममध्ये पाहायला हवं. ना कलाकारांची फौज, ना जड शब्दांतून बौद्धिक देणारे संवाद पण तरीही सर्वच पातळ्यांवर उत्तम जमून आलेली आणि सामाजिक संदेश देताना कुठेही न भरकटलेली ही गोष्ट शेवटाकडे जाताना डोक्‍यात नक्‍कीच अस्वस्थता निर्माण करते.
‘आपको पता नहीं वो कैसा दिखता है?’ या प्रश्‍नावर त्या चिमुरडीचं ‘मुझे मालूम नहीं, सबके जैसा’ हे उत्तर ‘बाललैंगिक शोषणा’चं भयाण वास्तव आपल्यासमोर मांडते. आपल्या आजूबाजूला बागडणारी चिमुरडी खरंच त्यांचं बालपण निरागसतेने जगताहेत का, की अनेक विकृत स्पर्श त्यांचं हे स्वच्छंदी जगणं हिरावून घेताहेत, या प्रश्‍नाने मेंदूंत मुंग्या निर्माण करणारी ही शॉर्टफिल्म इज मस्ट वॉच.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)