मायक्रो स्क्रीन्स : आई शप्पथ   

प्राजक्‍ता कुंभार 

लहानपणी आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात किमान काही प्रसंग असे येतात की ज्यामुळे आपण मोठे होताना कोणती मूल्यं, कोणते विचार पुढे घेऊन जाणार याची आपल्याला जाणीव होते. म्हणजे त्याप्रसंगी ते आपल्याला छोटुशा मेंदूला कितपत जाणवतं हा प्रश्‍नच आहे. पण तरीही हे प्रसंग येतात ते तुकड्या-तुकड्यांमध्ये स्वतःच मोठं होणं अनुभवण्यासाठी, आणि ते एकत्र जोडलं की आपल्या परिपूर्ण व्यक्‍तिमत्त्वाचा कोलाज तयार होतो. खूप छोट्या छोट्या गोष्टींवर विश्‍वास असतो आपला, श्रद्धा असते आपली लहानपणी. एकूण काय, तर ना धड निरागसता सुटू पाहते, ना आपण क्षणात मोठे होते, कुठेतरी ताटकळत असतो मधेच. ‘आई शप्पथ’ ही गौतम वझे या दिग्दर्शकाची 15 मिनिटांची गोष्ट उलगडते हाच, कुठेतरी मधेच अडकून राहण्याचा प्रवास.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्वतःचा खरेपणा पटवून देण्यासाठी, गळ्याशी दोन बोट नेऊन, ‘आई शप्पथ’ असं म्हणणं, ही लहानपणीची आयडिया आपल्यापैकी प्रत्येकानं वापरली असणार आणि ‘आईची शप्पथ कधीही खोटी घ्यायची नसते’ हेही मनात पक्‍क बिंबलेलं असणार. हाच बालपणीचा प्रवास अनुभवतो आपण पुन्हा ‘आई शप्पथ’ या शॉर्टफिल्ममधून.

ही गोष्ट आहे सोहम (अभिषेक बचनकर) ची. हे मुंबईमध्ये, एका चाळीत आपल्या आई बाबांसोबत राहणार, मध्यमवर्गीय घरातलं एक छोटा पिल्लू आहे. त्याच्याकडे त्याचा मामा, मामी आणि मामेभाऊ निनाद (आर्यन दळवी) दोन दिवस राहायला आलेत ठाण्याहून. चाळीतल्या मित्रांसोबत क्रिकेट खेळताना, हा निनाद आऊट होतो. पण ‘मी आऊट नाहीचे’ हे सगळ्यांना पटवून देण्यासाठी ‘आई शप्पथ, मी नाही झालोय आऊट’ अशी शपथ घेतो.

छोटा सोहम, ज्याला निनाद खरंच आऊट झालाय, हे ठाऊक असतं, तो या खोट्या शपथेमुळे हादरून जातो. खेळ संपतो. घरी परत जाताना तो निनादला ‘तुला कळतंय का, तू काय केलंयस? अशी आईची खोटी शपथ कोण घेतं? तुला माहितीये ना, काय होतं खोटी शपथ घेतल्यावर?’ असे अनेक निरागस प्रश्न विचारतो. पण त्यावर निनाद ‘काही नाही होतं रे, चल घरी जाऊ’ असं अगदी निवांत उत्तर देतो. त्याला त्या खोट्या शपथेची मुळीच फिकीर नसते.

पण सोहमच्या इवल्याशा मेंदूंत मात्र सुरू होते मामीबद्दलची अखंड काळजी. आपल्या लाडक्‍या मामीला (मधुरा वेलणकर-साटम) निनादच्या खोट्या शपथेमुळे काही होणार तर नाही ना, हा विचार सतत डोक्‍यात फिरत राहतो. खूप मोठं चुकलंय काहीतरी हे जाणवत असतं त्याला आणि ते त्याला त्याच्या आईला (ऋजुता देशमुख) सांगायचंही असतं. पण नाही जमत ते. शेवटी सोहमपुढे उरतो एकच पर्याय, तो म्हणजे मामीला क्षणभरही नजरेआड करायचं नाही. पुढे दोन दिवसांच्या पाहुणचारानंतर, सोहमची मामी सुखरूप ठाण्याला पोहचते आणि याच्या जीवात जीव येतो. पुन्हा सुरू होतो चाळीत क्रिकेटचा खेळ… यावेळी तर खूप महत्त्वाची मॅच असते. जिंकायला एक रन हवाय आणि सोहम आऊट! तो आऊट झाला तर ही मॅच हरणार. तो सांगतोय सगळ्यांना, “मी नाहीये आऊट…’ आणि आईची शप्पथ घ्यायला त्याचा हात गळ्याशी जातो. पुढे काय होतं हे जाणून घेण्यासाठी ही शॉर्टफिल्म पाहणं इज मस्ट.

वर्ष 2017 च्या जिओ मामी फिल्म फेस्टिवल मध्ये विजेती ठरलेली ही शॉर्टफिल लक्षात राहते ती तिच्या सहजसोप्या कथानकामुळे. आपल्याला जुने दिवस आठवून देणारी ही फिल्म जरूर पहावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)