मायक्रो-स्क्रीन्स : ज्युस… 

प्राजक्ता कुंभार 
एखाद्या घरातलं वातावरण, त्या घरावर झालेले संस्कार जाणून घ्यायचे असतील तर त्या घराच्या स्वयंपाकघरावर एक नजर फिरवावी. संपूर्ण कुटुंबाच, तिथल्या कुटुंब व्यवस्थेचं प्रतिबिंब हे त्या एका खोलीत सामावलेलं असतं. स्वयंपाकघरातलं वातावरण अतिशय बोलकं असतं. खेळीमेळीने, मिळून काम करणारे घरातले सदस्य, छोट्या छोट्या कामांमध्ये मदत करणारे घरातली छोटुली, हे असं चित्र दिसलं तर, ‘शर्िींरश्रळीूं’ ही फक्त भावना न राहता, ती कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याच्या मनात खोलवर रुजलीये, हे सहज लक्षात येत. याउलट घराच्या दिवाणखान्यात, टीव्हीसमोर पाय पसरून सोफावर लोळत बसलेले पुरुष आणि स्वयंपाकघरात घामाने निथळत, कोणत्याही मदतीशिवाय राबणाऱ्या स्त्रिया दिसल्या की एका क्षणात, संपूर्ण घराचा चित्र उलगडतं. ‘ज्युस’ ही नीरज घायवान या दिग्दर्शकाची गोष्ट, कदाचित टोकाची स्त्रीवादी वाटेलही अनेकांना, पण कुठेतरी ती आजच्या काळातली परिस्थिती अधोरेखित करते, हे वास्तवही नाकारता येत नाही.
एक साध्यासुध्या मध्यमवर्गीय घरातली गोष्ट आहे ही. घरात मित्रांचं गेटटुगेदर आहे. दिल्लीतल्या असह्य उकाड्यात हॉलमध्ये कुलरसमोर बसून निवांत गप्पा सुरू आहेत. शेफाली शाह (जिच्या घरी पार्टी आहे) ती स्वयंपाकघरातून मद्यास्मवेत खायला अनेक पदार्थ आणून टेबलवर ठेवतीये, रिकामे चषक पुन्हा भरले जाताहेत. एकूण निवांत वातावरण आहे. स्वयंपाकघरात नेमकं याच्याविरुद्ध वातावरण आहे. उकाड्याने हैराण झालेल्या बायका, तशाच उभ्या राहून एकमेकींशी गप्पा मारत बाहेर काय हवं-नको ते बघताहेत. दिवाणखान्यात बसलेल्या पुरुषांना उकाड्याचा त्रास होऊ नये, म्हणून अधून मधून जाऊन कूलरमध्ये पाणी टाकायचं कामही सुरू आहे. पण स्वयंपाकघरातल्या उकाड्यावर मात्र अडगळीत पडलेल्या पंख्याचा उपाय करण्यात येतो.
प्रेगन्सीपासून, स्त्री-पुरुष समानतेवर सगळ्या चर्चा चालू असतात त्यांच्या; पण या सगळ्यात स्वतःच्या हक्‍कासाठी लढण्याचा, त्याची दाद मागण्याचा साधा अभिनिवेशही कुठेच नसतो. “जे चाललंय ते योग्यच आहे, आणि समजा नसेलही बरोबर तरी आपणच समजून घ्यायला हवं’, असाच अविर्भाव या बायकांचा असतो. प्रेग्नन्सी नंतर बायकांनाच जास्त अडजस्टमेन्ट करावी लागते, आणि ते साहजिक आहे, या मुद्द्याकडे चर्चा वळते आणि मंजू (शेफाली शाह) च्या सहनशीलतेचा बांध फुटतो. दिवाणखान्यातून ऐकू येणारे खिदळण्याचे आवाज आणि स्वयंपाकघरात बायकांचा हे सतत सहनशील वागणं, आपणही त्याचाच एक भाग झालोय याची तिला जाणीव होते. कोणाच्या ध्यानीमनी येणार नाही असा निर्णय मंजू घेते आणि ‘निव्वळ शांततेत’ ही गोष्ट संपते.
गोष्ट साधी वाटली, क्‍लायमॅक्‍स साधा वाटला, तरी या गोष्टीतून दिला जाणारा संदेश हा सगळ्याच पातळ्यांवर महत्त्वाचा आहे. या शॉर्ट फिल्ममध्ये कुठेही आयुष्यच तत्त्वज्ञान सांगणारे संवाद नाहीयेत, अगदी आपल्या नायिकेची, म्हणजे मंजूचीही आयुष्याची कोणती फिलॉसॉफी नाही. पण कथेला पुढे नेण्यासाठी छोट्या-छोट्या प्रसंगांची अगदी खुबीने पेरणी करण्यात आली आहे. आपल्या मुलांमध्ये आपण आपल्या विचारांचं संकर किती नकळतपणे करतं असतो हे दाखवणारा, व्हिडीओ गेमचा प्रसंग अफलातून असाच आहे. स्वतः असमान वागणुकीचा सामना करत असताना, आपल्याहून कमी सामाजिक दर्जा असणाऱ्या व्यक्तीशी आपणही त्याच मानसिकतेने वागतो, हे दाखवण्यासाठी चहाच्या कपचा प्रसंगही उत्तम जमला आहे. या प्रसंगात एक शब्दही न बोलता शेफाली नजरेतूनच जे व्यक्त करते, ते खरंच दाद देण्यासारखं आहे. (यालाच कदाचित मुरलेला अभिनय म्हणत असावेत.)
शेफाली या गोष्टीची जान आहे. गोष्टीच्या सुरुवातीपासून ते क्‍लायमॅक्‍सच्या शेवटच्या फ्रेमपर्यंत तिच्या वागण्याबोलण्यातून ही गोष्ट उलगडत जाते. स्त्री-पुरुष समानतेवर पुरोगामी मतं व्यक्‍त करणाऱ्या, समानतेच्या हक्कावर लढण्याच्या अनेक गोष्टी आपण आजवर पहिल्या आहेत. पण स्वयंपाकघरात, नवऱ्याच्या आवडीनिवडी जपणारी मध्यमवर्गीय स्त्री, जेव्हा स्वतःच्या अस्तित्वाला सावरणारी छोटीशी कृती करते, त्या परिणामाची गोष्ट सांगणारी ही शॉर्ट फिल्म नक्कीच पाहायला हवी. शिवाय वर्ष 2018 चा बेस्ट शॉर्ट फिल्मचे “फिल्मफेअर ऍवॉर्ड’ही “ज्युस’ याच फिल्मला मिळालेले आहे.

https://youtu.be/R-Sk7fQGIjE


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)