मिशेल मामा आणि मोदी मामा व्यावसायिक प्रतिस्पर्धी : सुशीलकुमार शिंदेंची उपरोधिक टिका

अंबानीसह अनेक उद्योजक लाभार्थी

मुंबई: राफेल विमान खरेदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी व कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपामध्ये आता कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही उडी घेतली आहे. आपल्या उद्योगपती मित्रांसाठी राफेल तसेच अन्य व्यवसायात “प्रधानमंत्री मध्यस्थी योजना’ लागू करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या व्यवसायात कोणीही प्रतिस्पर्धी नको म्हणून आकांडतांडव करत आहेत. मिशेल मामा आणि मोदी मामा हे व्यावसायिक प्रतिस्पर्धीच आहेत. त्यामुळेच मोदींची बिनबुडाची आगपाखड सुरु आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना सुशीलकुमार शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. तसेच सोलापूरमध्ये पंतप्रधानांच्या दौऱ्यात कॉंग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा त्यांनी समाचार घेतला. मोदींच्या दौ-याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर परिसरातील कॉंग्रेस नेते आणि धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तसेच एनएसयुआय आणि युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी बेदम मारहाण केली. पोलिसांच्या या दडपशाहीचा तीव्र शब्दांत निषेध करून शिंदे यांनी मारहाण करणा-या मस्तवाल पोलीस अधिका-यांना तात्काळ निलंबत करण्याची मागणी केली.

मोदी सरकारच्या विरोधात प्रचंड मोठ्या प्रमाणात जनआक्रोश वाढत चालल्यानेच विरोधकांचे तोंड बंद करण्याकरिता सरकार पोलीस अंगावर सोडत आहे. परंतु लाथा बुक्‍क्‍यांनी मारहाण करून कायदा हातात घेणा-या पोलिसांनी सत्ता येत-जात असते याची जाणिव ठेवावी, असा इशारा त्यांनी दिला. सोलापूरच्या दौऱ्यासाठी आणिबाणी सदृश्‍य परिस्थिती आणली गेली. हे मोदी हुकुमशाही मानसिकतेचे असल्याचे निदर्शक आहे, असेही ते म्हणाले.

विविध प्रकल्पांच्या भूमिपूजनासाठी गेल्या काही महिन्यात अनेक वेळा राज्यात आलेल्या पंतप्रधानांनी दुष्काळग्रस्त शेतक-यांना मदत करण्याबाबत चकार शब्द काढला नाही. राज्यात सतरा हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. यातील एकाही शेतक-याच्या घरी जायला पंतप्रधानांना वेळ मिळाला नाही, असे सांगतानाच निवडणुकीत दिलेल्या किती आश्वासनांची पूर्तता केली ते मोदींनी सांगावे, असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले.

भ्रष्टाचा-यांना चौकीदाराचे संरक्षण
सोलापूरमध्ये येऊन आपल्या अनेक योजनांची भलामण करत आपण फार महान कार्य करत आहोत, हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न पंतप्रधानांनी केला. यासोबतच त्यांनी त्यांच्या खास उद्योगपती मित्रांसाठी सुरु केलेल्या “प्रधानमंत्री देश लुटो और भाग जाओ’ योजना जिचे लाभार्थी नीरव मोदी, हमारे मेहुल भाई, विजय मल्ल्या, ललित मोदी आहेत. याबद्दलही जनतेला माहिती द्यायला हवी होती, अशी उपरोधिक टीका करीत भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले पंतप्रधान स्वतःला चौकीदार म्हणत होते. त्यामुळे भ्रष्टाचा-यांना चौकीदाराचे संरक्षण असल्याचे पुन्हा सिद्ध झाले असल्याचा टोलाही सुशीलकुमार शिंदे यांनी लगावला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)