पुणे – पुण्याच्या प्रगतीला मेट्रोचा “बूस्टर डोस’

पुण्याच्या वैभवात भर घालणाऱ्या मेट्रोची घोडदौड सुसाट सुरू आहे. अपेक्षेप्रमाणे हे काम गतीने पूर्णत्वास जात असून आजअखेर 28 टक्के काम मार्गी लागले आहे. वाहतूक कोंडीवर मात करणाऱ्या या प्रकल्पाला 19 टक्के अर्थ पुरवठा शासनाने केला. भाजपच्या राजकीय अजेंड्यावर या विषयाला सर्वोच्च प्राधान्य देऊन आम्हीही एक पाउल पुढे टाकले आहे. त्यामुळे संपूर्ण पुणे आता मेट्रोमय झाले आहे.

पुणे मेट्रो हा भाजपचा ध्यास आहे. आमचा तो श्‍वास आहे. म्हणूनच या वर्षाखेरीस पिंपरी-चिंचवड-रेंजहिल्स मार्गावर मेट्रो धावल्याचे पुणेकरांना दिसेल. लवकरच सिंहगडरोड, वाघोली, हडपसर आणि कात्रज या मार्गांवरील मेट्रोचे काम मार्गी लागेल. चांदणी चौकातील शिवसृष्टीपर्यंत मेट्रो जावी. स्वारगेटहून कात्रजपर्यंत तिचा विस्तार व्हावा. नदीकाठच्या रस्त्यांवर स्कायवॉकची सुविधा द्यावी. मेट्रोचे सर्वच मार्ग व्हर्टिकल गार्डनद्वारे सुशोभित व्हावा. एकात्मिक वाहतुकीद्वारे रेल्वेची सर्व स्टेशन्स मेट्रोशी जोडावीत, या दिशेने आम्ही कार्यरत आहोत.

थोडक्‍यात आढावा घेतला, तर पिंपरी-चिंचवड-शिवाजीनगर मार्गावरील 456 पैकी 201 आणि वनाझ-शिवाजीनगर या मार्गावरील 308 पैकी 152 खांब उभारले गेले आहेत. रामवाडी-शिवाजीनगर या सर्वांत लांब पल्याच्या मार्गावर 1,592 खांब उभारले जाणार आहेत. त्यापैकी 138 खांब बांधून तयार आहेत. यावरील प्रत्यक्ष मेट्रोमार्ग तयार करणारे साचे तयार आहेत. ते बसवण्याचे काम कोथरूड परिसरात वेगाने सुरू आहे. हिंजवडी-शिवाजीनगर या मार्गासाठी 6,214 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यालाही केंद्राने मंजुरी दिली आहे. सुमारे 24 किलोमीटरचा मेट्रोचा हा मार्ग प्रत्यक्षात एप्रिल-2021 मध्ये कार्यान्वित होईल.

पर्यावरणाचे संतुलन राखून मेट्रोचे काम झपाट्याने पुढे नेण्यासाठी वृक्ष लागवड व पुनर्रोपण हे काम हे मिशन म्हणून स्वीकारले गेले आहे. त्यानुसार औंध, तळजाई, रेंजहिल्स या परिसरात 5 हजार 200 झाडे लाऊन झाली आहेत. तर आकुर्डी व पिंपरी-चिंचवड परिसरात 5 हजार 500 झाडे बहरू लागली आहेत. मेट्रो मार्गातील 658 झाडे पुनर्रोपणाद्वारे जोमाने वाढत आहेत.

पुण्याचा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा मेट्रोच्या रचनेत प्रतिबिंबीत होणार आहे. डेक्कन जिमखाना व संभाजी पार्क ही दोन स्टेशन्स पुणेरी पगडीच्या आकारात साकारली जाणार आहेत. तर शिवाजीनगर येथे 30 मजली भव्य स्टेशनची उभारणी केली जाणार आहे. फ्रान्स आणि स्पेनमधील वास्तूविशारद यांनी त्याचा आराखडा बनविला आहे. स्वारगेट मल्टिमॉडेल हब हा देशातील एकात्मिक वाहतुकीचा सर्वोत्तम प्रकल्प ठरेल.

अडथळ्यांची शर्यत पार पाडत डिसेंबर 2016 मध्ये केंद्र सरकारने पुणे मेट्रोला मान्यता दिली. त्यापाठोपाठ राज्य सरकार व पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेने कायद्याच्या बाबींची पूर्तता केली. त्यानंतर 24 डिसेंबर 2016 रोजी पंतप्रधान मोदी यांनी पुण्यातच या प्रकल्पाचे भूमिपूजन केले. हा प्रकल्प पहिल्या टप्यात 31.25 किलोमीटरचा आहे. त्यामध्ये दोन मार्ग आणि एका डेपोचा समावेश आहे. त्यातील पहिला मार्ग हा पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट असा असून तो 16.59 किमीचा आहे. त्यातील 5 किमी मार्ग भूमिगत आहे. तर दुसरा मार्ग वनाज ते रामवाडी असा 14.66 किलोमीटरचा आहे. त्यावर 16 स्टेशन्स असतील.

या प्रकल्पावर 11 हजार 420 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पिंपरी-चिंचवड-रेंजहिल्स मेट्रो स्टेशनसाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. तेथील एन्ट्री व एक्‍झिटचे कामही वेगाने सुरू आहे. रेंजहिल्स ते स्वारगेट मार्गावरील भूमिगत मेट्रोचे काम दोन ठिकाणी विभागले गेले आहे. त्यातील कृषी विद्यापीठ ते बुधवार पेठ हा भुयारी मार्ग व त्यातील स्टेशन्सची वर्कऑर्डर देण्यात आली आहे. बुधवार पेठ ते स्वारगेट स्थानक या दुसऱ्या भुयारी मार्गाच्या निविदा मागवण्यात आल्या आहेत. रेंजहिल्स-वनाज डेपोसाठीची जागा महापालिकेने मेट्रोकडे सुपूर्द केली आहे. स्वारगेट स्थानकासाठी जागेचा ताबाही मेट्रोला मिळाला आहे. शिवाजीनगरच्या चार धान्य गोदामांचा ताबाही मेट्रोला मिळाला आहे.

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे कामही लवकरच

हिंजवडी आयटी क्षेत्रात लाखो तरुण कार्यरत आहेत. यामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत होती. ती सोडवण्यासाठी हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गावर धावणाऱ्या मेट्रोचे भूमिपूजन झाले आहे. या मेट्रोसाठी टाटा आणि सिमेन्स कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. एएफडी फ्रान्स बॅंक आणि केन्द्र सरकार यांच्यातही मेट्रोच्या उभारणीसाठी दोन हजार कोटी रुपयांचा सामंजस्य करार झाला आहे. मेट्रोच्या सिग्नलिंगचे काम अलस्टॉम कंपनी करणार आहे. यात स्थानिकांना अधिकाधिक काम देण्याचे धोरण स्वीकारल्याने बेराजगारीची समस्या निवळली आहे.
– गिरीश बापट
पालकमंत्री, पुणे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)