हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचा नारळ दिवाळीत फुटणार 

– टाटा व सिमेन्स कंपनीला प्रकल्पाचे काम 
– तीन वर्षांत उभारणार 23 किमीचा मार्ग 
मेट्रो प्रवासाचे दर…
हिंजवडी ते शिवाजीनगर या 23 किमी लांबीच्या प्रवासाचे दर किती असतील याचा अंदाज गिरीश बापट यांनी सांगितला. पहिल्या दोन किमीसाठी 10 रूपये, तर त्यानंतर प्रत्येक दोन किमीमागे 2 रूपये वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
मुंबई: वाहतुक कोंडीमुळे गजबजलेला हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यानचा प्रवास आता सुस्साट होणार आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून राबविण्यात येणारा हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाचे काम टाटा व सिमेन्स या कंपनीला संयुक्त भागीदारीमध्ये देण्यात आला आहे. या मेट्रोच्या कामाचा नारळ आता दिवाळीत फुटणार आहे. येत्या तीन वर्षांत 23 किमी लांबीच्या प्रकल्पाचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज दिली.
हिंजवडी मेट्रो प्रकल्पामुळे येथील माहिती व तंत्रज्ञान क्षेत्राला चालना मिळणार आहे. तसेच या प्रकल्पामुळे
नागरीकांची वाहतूक कोंडीतून व प्रदुषणातून सुटका होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात टाटा व सिमेन्स या दोन कंपन्यांसोबत करार करण्यात आला. तसे कामाचे पत्रही त्यांना देण्यात आले. 23 किमी लांबी असलेल्या या प्रकल्पाची किंमत अंदाजे 8313 कोटी रूपये असून केंद्र शासनाच्या नवीन मेट्रो धोरणातंर्गत व खासगीकरणाच्या माध्यमातून हा प्रकल्प उभारला जाणार आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या आर्थिक साह्यातून व टाटा-सिमेन्स यांच्या खासगी गुंतवणूकीतून या प्रकल्पाची उभारणी करणार असून दिवाळीत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. कामाची सुरूवात झाल्यापासून पुढील तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होऊन वाहतुकीस खुला होणार असल्याचे गिरीश बापट यांनी सांगितले.
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रत्यक्षात सुरु झाल्यानंतर टाटा व सिमेन्स या कंपन्यांना पुढील 35 वर्षांसाठी हा प्रकल्प बांधा, गुंतवणूक करा, चालवा व हस्तांतरीत करा या तत्त्वावर देण्यात आला आहे. मंत्रालयात आज झालेल्या करार कार्यक्रमादरम्यान मुख्य सचिव डी. के. जैन, अपर मुख्य सचिव (वित्त) युपीएस मदान, अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव नितिन करीर, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गिते, टाटा समुहाचे चेअरमन नटराजन चंद्रशेखरन व सिमेन्स समुहाचे ग्लोबल सीईओ राल्फ हेसलबेचर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)