फिफा विश्वचषक : जगातील अव्वल खेळाडू मेस्सीला अखेर सूर गवसला…

नायजेरियावर 2-1 ने संघर्षपूर्ण विजय
सेंट पीटर्सबर्ग: जगातील अव्वल खेळाडू लियोनेल मेस्सीला अखेर सूर गवसला. सामन्याच्या केवळ 14व्या मिनिटाला नायजेरियावर अफलातून मैदानी गोल करून मेस्सीने अर्जेंटिनाला आघाडीवर नेले. यंदाच्या फिफा विश्‍वचषक स्पर्धेतील मेस्सीचा हा पहिलावहिला गोल ठरला. मात्र नायजेरियाला 2-1 असे निर्णायकरीत्या पराभूत करून सामन्याचा निकाल लावण्यासाठी अर्जेंटिनाला 86व्या मिनिटापर्यंत वाट पाहावी लागली.

सामन्याच्या 14व्या मिनिटापर्यंत दोन्ही संघ जणू काही परस्परांची ताकद आजमावत होते. त्यानंतर उजव्या बगलेवरून पुढे चाल करणाऱ्या मेस्सीला मध्यरक्षक बानेगाकडून मिळालेल्या पासमुळे नायजेरियाचे खेळाडूही काही क्षण गोंधळले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मेस्सी मात्र सावध होता. त्याने डाव्या मांडीवर चेंडू रोखत पुढे चाल केली आणि काही सेकंदांतच उजव्या पायाने जबरदस्त तडाखा लगावीत चेंडू गोलच्या उजव्या कोपऱ्यात मारला, तेव्हा नायजेरियाचा गोलरक्षक फ्रॅन्सिस उझोहोला अजिबात संधी मिळाली नाही. त्यानंतरची काही मिनिटे अर्जेंटिनाच्या अखेळाडूंनी नायजेरियाच्या गोलवर किमान तीन वेळा चढाया केल्या. परंतु गोलरक्षक उझोहोने निकराचे प्रयत्न करीत गोल रोखले.

वास्तविक पाहता सामन्याचा सूर या गोलमुळे निश्‍चित झाला होता. मध्यंतराला अर्जेंटिनाने 1-0 अशी आघाडी कायम राखली. परंतु उत्तरार्धात अचानक चित्र पालटले. जेव्हियर मॅस्चेरानोने केलेल्या फाऊलमुळे पंचांनी नायजेरियाला पेनल्टी किक बहाल केली आणि व्हिक्‍टर मोझेसने अचूक लक्ष्यवेध करताना नायजेरियाला 51व्या मिनिटाला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. या गोलमुळे अर्जेंटिनाचे खेळाडू दडपणाखाली आल्याचे स्पष्टपणे जाणवत होते.

अखेर 86व्या मिनिटाला गॅब्रिएल मेर्काडोच्या पासवर अप्रतिम गोल करताना मार्कोस रोजोने अर्जेंटिनाला 2-1 असे आघाडीवर नेले, तेव्हा अर्जेंटिनाच्या पाठीराख्यांनी एकच जल्लोष केला. अर्जेंटिनाचा महान खेळाडू दिएगो मॅराडोनानेही दुसऱ्या गोलनंतर प्रेक्षक गॅलरीत जल्लोष केला. मात्र या सगळ्यात सुटकेची भावनाच अधिक दिसत होती. पंचांनी खेळ संपल्याची शिट्टी वाजविल्यानंतर मॅस्चेरानोने मेस्सीला मिठी मारली, तेव्हाही मेस्सीच्या चेहऱ्यावरील तणाव जाणवण्यासारखा होता.

वास्तविक पाहता ड गटातून अर्जेंटिना संघ पहिल्या क्रमांकाने बाद फेरी गाठणार असाच जाणकारांचा कयास होता. परंतु क्रोएशियाने अर्जेंटिनावर सनसनाटी मात करताना फिफा विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेतील सर्वाधिक खळबळजनक निकालाची नोंद केली. त्यानंतर आईसलॅंडला बरोबरीत रोखताना अर्जेंटिनाने आपले आव्हान कसेबसे कायम राखले. त्यामुळे अखेरच्या साखळी सामन्यात नायजेरियावर विजय मिळविण्यापलीकडे अर्जेंटिनाकडे अन्य पर्याय नव्हता.

क्रोएशियाने तीनही साखळी सामने जिंकून ड गटातून पहिल्या क्रमांकाने बाद फेरी गाठली असून नायजेरियावरील विजयामुळे 4 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावरील अर्जेंटिनाने अखेरच्या 16 संघांमध्ये प्रवेश केला. आता येत्या शनिवारी होणाऱ्या उपउपान्त्यपूर्व फेरीच्या लढतीत अर्जेंटिनासमोर फ्रान्सचे कडवे आव्हान आहे. बाद फेरीची मोहीम सुरू होत असतानाच मेस्सीला सूर गवसल्यामुळे अर्जेंटिनाच्या गोटात समाधानाचे वातावरण असले, तरी सर्व काही आलबेल नसल्याचे संकेत गेल्या तीनही सामन्यांमध्ये मिळाले आहेत.

मेस्सीच्या कामगिरीबद्दल प्रश्‍नचिन्ह

आईसलॅंडविरुद्ध पेनल्टी किक हुकल्यानंतरच मेस्सीच्या फॉर्मबद्दल चर्चा सुरू झाली होती. मात्र क्रोएशियाविरुद्धचा पराभव टाळण्यासाठी तो फारसे काही करू शकला नसल्याचेही स्पष्ट झाल्याने मेस्सीच्या क्षमतेबद्दलही प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले. परंतु अर्जेंटिनाच्या संघव्यवस्थापनाने मेस्सीचीच बाजू घेतली.

क्रोएशियाविरुद्ध सामन्याचे एकंदर स्वरूपच मेस्सीसाठी फारसे योग्य नव्हते, असे सांगून अर्जेंटिनाचे प्रशिक्षक जॉर्ज सॅम्पाओली म्हणाले की, महत्त्वाच्या सामन्यांमध्ये मेस्सी निश्‍चितपणे आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी बजावेल. सॅम्पाओली यांच्या आत्मविश्‍वासाला साजेशी कामगिरी मेस्सी करू शकेल किंवा नाही हे येत्या काही दिवसांत सिद्ध होईलच. परंतु त्याच्या कामगिरीवर अर्जेंटिनाचे भवितव्य अवलंबून आहे, हे विसरून चालणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)